हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) मागच्या वर्षी भारतातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाविरुद्ध खळबळजनक अहवाल आणून मोठा बॉम्ब फोडला होता. अदानी समूहाविरुद्ध अनेक खळबळजनक आरोप करत हिंडनबर्गने संपूर्ण मार्केटमधील अदानींची पॉवर बघता बघता कमी केली होती तसेच संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. आता याच हिंडनबर्ग रिसर्चने भारताबद्दल आणखी एक मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे अदानी नंतर आता कोणाचा नंबर असू शकतो अशा चर्चा सुरु आहेत.
हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे, भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार आहे. हे अपडेट शेअर होताच जागतिक व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली. हिंडेनबर्गने या पोस्टमध्ये थेटपणे कोणाचं नाव घेतलं नाही, परंतु चर्चाना मात्र चांगलंच उधाण आलं. आज सकाळी 9:30 पर्यंत, X वरील Hindenburg च्या या अपडेटला दीड दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते आणि सुमारे साडेचार हजार वेळा रिपोस्ट केले गेले होते.
अदानी समूहावर काय आरोप होते? Hindenburg Research
शेअरच्या किमतीत फेरफार करण्यापासून ते व्यवसायात अनुचित पद्धतींचा अवलंब करण्यापर्यंतच्या एकामागून एक अनेक खळबळजनक आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलं होते. या आरोपाचा मोठा फटका आणि तोटा अदानी समूहाला भोगावा लागला. या अहवालामुळे अदानी समूहाच्या सर्व शेअर्सचे भाव कोसळले होते. त्यावेळी अदानी समूहाला बाजार भांडवलात तब्बल $86 बिलियनचे नुकसान झालं होते. हे नुकसान अदानी समूह अजूनही भरून काढू शकलेला नाही. त्यावेळी अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्चचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते, तसेच हे सर्व आरोप म्हणजे भारतावरील हल्ला असल्याचे सुद्धा अदानी समूहाकडून सांगण्यात आलं होते. महत्वाची बाब म्हणजे हिंडनबर्गने केलेला एकही आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे हिंडनबर्गच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतेय.