कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली. पीडितेच्या मृत्यूनंतर राजकीय क्षेत्रांतील नेत्यांकडून या घटनेवर दुःख व्यक्त केलं जात आहे. हिंगणघाट येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेतील तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुश्रीफ म्हणाले ”हिंगणघाट ची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने त्या नराधमाने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केलं त्याचा निषेध केलाच पाहीजे. परंतु उपचारादरम्यान त्या मुलीचं निधन होणे ही अत्यंत दुःखद घटना आहे. अशा शब्दात मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच अशा घटनांमधील नराधमांना धडा शिकवण्यासाठी कडक कायदा आपण करत आहोत आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी होईल. अशी ग्वाही सुद्धा मुश्रीफ यांनी दिली.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.