वाळू माफियांना दणका; तब्बल 46 कोटींचा ठोठावला दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गौण खजिन्यावर डोळा ठेवून महसूल यंत्रणेला न जुमानता अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांना तहसील प्रशासनाने दुसऱ्यांदा दणका दिला आहे. तालुक्यातील वाळूज मंडळातील आसेगाव येथील वाळू माफियांना शेहचाळीस कोटीचा दंड ठोठावून त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्यात आला आहे.

वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी ही मोहीम तीव्र करणार असून, वेळ पडल्यास संबंधितांच्या जमिनीच्या लिलावातून दंड वसूल करणार असल्याचे तहसीलदार सतीश सोनी यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात याच मंडळातील आसेगाव, कासोडा, तळेसमान, नांदेडा व मुस्तफाबाद येथील एकूण 27 वाळू माफियांच्या सातबाऱ्यावर महसूल प्रशासनाने 6 कोटींचा बोजा टाकला होता. तेव्हाच या कारवाईचे संकेत देण्यात आले होते. तालुक्यातील आतापर्यंतची हि सर्वात मोठी कारवाई असून यामुळे तालुक्यातील इतर वाळू माफियांना तात्पुरता वचक बसणार असला तरी याविरोधात कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गौणखनिज माफियांवर अनेकदा कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

परंतु ते प्रशासकीय यंत्रणेला न जुमानता पुन्हा नव्या जोमाने अवैध वाळू उपसा करत असल्याची स्थिती आहे. अशाच मुजोर व प्रशासनाला कोणतीही दाद न देणाऱ्या वाळूज मंडळातील आसेगाव शिवारातून केवळ तीन वाळू चोरांनी एकूण 16 हजार 138 ब्रास वाळूचा अवैध उपसा केला आहे. तर याच शिवारातील दोघांनी 675 ब्रास मुरुमाचा अवैध उपसा केला आहे. अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना नियमानुसार बाजार मूल्यापेक्षा पाचपट अधिक दंड आकारण्यात येतो. त्याआधारे तहसीलदार सतीश सोनी यांनी संबंधित वाळू चोरांना जोरदार दणका दिला आहे. या कारवाईत पाच जणांच्या सातबाऱ्यावर तहसीलदार सतीश सोनी यांनी कारवाई करून एकूण 46 कोटी 19 लाख 36 हजार 380 रुपयांचा दंड ठोठावून बोजा चढवला आहे. लाखोंचा दंड आकारल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. या कारवाईचे नागरिकांमध्ये स्वागत करण्यात येत आहे तर वाळू माफियांत खळबळ माजली आहे.

यांना ठोठावला दंड –
1) अहेमद उस्मान पठाण रा.आसेगाव; 8112 ब्रास मातीमिश्रित वाळू उपसा. दंड 25 कोटी 44 लाख 49 हजार 104 रु

2) शेख जेहुर शेख कासम रा.आसेगाव ;1728 ब्रास मातीमिश्रित वाळू उपसा. दंड 5 कोटी 42 लाख 2 हजार 176 रु.

3) शे.हनिफ शे.कासम रा. आसेगाव; 6300 ब्रास माती मिश्रित वाळू उपसा. दंड 19 कोटी 76 लाख 12 हजार 100 रु.

4) अजमल खान अब्बास खान पठाण व एजाज खान अब्बास खान पठाण रा.आसेगाव 676 ब्रास मुरूम उपसा. दंड 44 लाख 55 हजार रु.

Leave a Comment