Sunday, May 28, 2023

औरंगाबादेत दिवाळीच्या मुहूर्तावर चोरट्यांचा हौदोस; डझनभर घरे फोडली

औरंगाबाद – दिवाळीच्या काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवू, गस्त घालू अशी आश्वासने देणाऱ्या पोलिसांवर चोरांनी मात केल्याचेच चित्र दिसले. दिवाळीच्या दरम्यान शहरात अनेक ठिकाणी चोरट्यांनी घरो फोडून डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील दहा घरांत चोरी झाली असून एकट्या पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच पाच घरे चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. यासह जवाहरनगर, उस्मानपुरा, बेगमपुरा, सिडकोतही चोरट्यांनी धुकाकूळ घातला. यावरून पोलिसांची गस्त कमी पडल्याचे दिसून आले.

आनंद राजकुमार चव्हाण हे चार भावांसह गारखेडा परिसरात राहतात. दिवाळीनिमित्त ते वैजापूर येथे गेले होते. त्यांचे लहान बंधू अजय चव्हाण हे शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत घरी होते. त्यानंतर ते कुटुंबियांसह तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून 10 तोळ्यांचे चांदीचे पैंजण, 7 तोळ्यांचे चांदीचे कडे, 12 तोळ्यांचे बाजूबंद, दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, इत्यादी दागिन्यांसह 30 हजार रोकड लंपास केली. शनिवारी रात्री दहानंतर हे घर बंद होते. शनिवारी रात्री ही चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरातील आणखी पाच घरे फोडल्याचे उघडकीस आले. एकट्या नवनाथनगरमध्ये पाच घरे फोडण्यात आली. तसेच भारत नगरात एक घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. या प्रकरणी पुंडलिकनगरात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक धनाजी आढाव करीत आहेत.

दिवाळीच्या काळात चोरांनी जवाबरनगर, उस्मानपुरा, बेगमपुरा आणि सिडको व वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही डल्ला मारला. तसेच सिडको एन-9 परिसरातील रेणुकामाता मंदिराच्या पाठीमागे राहणारे अमित काकडे यांच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्याने 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला