मद्याची दुकाने, बारवरील नावाबाबत गृहविभागाकडून यादी जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत नावे बदलण्यास मुदतवाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात यापुढे मद्यविक्री दुकाने व बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची, महनीय व्यक्तींची तसेच गड किल्ल्यांची नावे देण्यास राज्य सरकारने बंदी केली आहे. दरम्यान आता गृह विभागाकडून एक यादी जारी करण्यात आली आहे. तसेच त्या यादीतील काही विशिष्ट अशी नावे टाकू नयेत व असल्यास ती बदलण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी मद्याची दुकाने, बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची तसेच गडकिल्ल्यांची नावे दिल्याचे आढळून येते. याबाबत काही सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या. त्यांच्या तक्रारीनंतर विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचा मुद्दा उपस्थित केला गेला. यावर चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारकडून मद्याच्या दुकानावर राष्ट्रपुरुष व गडकिल्ले यांची नावे न लावण्याबाबत निर्णय जारी करण्यात आला.

आता पुन्हा मद्याची दुकाने, बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची तसेच गडकिल्ल्यांच्या नावाबात गृह विभागाने एक यादी जारी आहे. तसेच त्याचबरोबर दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांविषयी तसेच राष्ट्रपुरुषांविषयी प्रत्येकाच्या मनात आस्था आहे. त्यामुळे देवदेवता, राष्ट्रपुरुष आणि गडकिल्ले यांच्या नावाचा वापर केल्यास देवदेवता, राष्ट्रपुरुष व गडकिल्ल्यांची विटंबना तर होतेच, त्याशिवाय धार्मिक व सामाजिक भावना दुखावतात. त्याचबरोबर सामाजिक वातावरणही दूषित होते.

राज्यातील गडकिल्ले आणि राष्ट्रपुरुषांचा तसेच सर्वाच्या धार्मिक श्रद्धांचा आदर करणे व सामाजिक सलोखा कायम राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी राज्यात ज्या आस्थापनांमध्ये कोणत्याही प्रकारे मद्यविक्री अथवा मद्यपान सेवा दिली जाते, अशा आस्थापनांस सर्व धर्मीयांच्या देवदेवता, धार्मिक श्रद्धास्थाने, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती, यांची अशा आस्थापनांना नावे देण्यास मनाई करण्यात आली आहे.

बार, मद्याच्या दुकानाच्या फलकावर ‘ही’ नावे टाकता येणार नाहीत

राज्याच्या गृह विभागाकडून मद्याच्या दुकानावर व बारवर काही विशिष्ट अशी नावे टाकू नयेत, याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच एक यादी जाहीरही केली आहे. त्यात 56 राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा आणि राज्यातील 105 गडकिल्ल्यांच्या नावांचा समावेश आहे. सध्या मद्यविक्री दुकाने व बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची व गडकिल्ल्यांची नावे असतील तर ती 30 जूनपर्यंत बदलावीत, अशा सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.

Leave a Comment