Saturday, February 4, 2023

कोरोना बाधितांसाठी लोकवर्गणीतून तिरकवाडी ग्रामपंचायतीने उभारले होम आयसोलेशन

- Advertisement -

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन होम आयसोलेशन संकल्पनेंतर्गत कोरोना बाधीत रुग्णांसाठी तिरकवाडी (ता. फलटण) येथे कोरोना दक्षता कमिटी, ग्रामपंचायत तिरकवाडी व ग्रामस्थांचे प्रयत्नातून लोकवर्गणीतून जयभवानी हायस्कूल येथे ११ बेडचे होम आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी दिली आहे.

- Advertisement -

फलटण तालुक्यातील तिरकवाडी व परिसरात कोरोना पेशंटची वाढत असल्याने ग्रामपंचायतीने कोरोना बाधीत रुग्णांसाठी बेड व इतर साधने, औषधोपचार साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यानुसार अनेकांनी मदत व सहकार्य केल्याचे उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी निदर्शनास आणून दिले. गावचे रहिवासी व णमोकार मेडिकल, फलटणचे संजयभाई शहा यांनी ३ बेड, गावचे सुपुत्र व उस्मानाबाद वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांनी २ बेड, आनंदराव गोविंदराव सोनवलकर यांनी २ बेड, संभाजी शंकर शिंदे यांनी २ बेड, मुरलीधर गणपत नाळे (गुरुजी) यांनी १ बेड व ग्रामपंचायत तिरकवाडी सदस्या सौ. आरती महेश सोनवलकर पाटील यांनी १ बेड असे ११ बेड उपलब्ध करुन दिले आहेत.

तिरकवाडी येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेचे १९४६ सालचे इयत्ता ४ थी मधील माजी विद्यार्थी अतुल सोनवलकर, सिराज शेख, श्रीकांत बनकर, विशाल सोनवलकर, दस्तगीर शेख, प्रशांत काळभोर, पुरुषोत्तम नाळे, दीपक धोटे, श्रीकांत शिंदे यांनी ही संकल्पना समजल्यानंतर उत्स्फूर्तपणे पुढे येऊन ५ ऑक्सीमीटर, १० डिजीटल थर्मामीटर, २ बीपी चेक मॉनिटर, ४०० मास्क, २ कॅन सॅनिटायझर, २५ सॅनिटायझर स्प्रे व १० स्टीमर मशीन वगैरे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे.

फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी होम आयसोलेशन सेंटरला भेट देवून प्रा. आरोग्य केंद्राच्या संबंधीत कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशन सेंटरला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच आशा वर्कर यांना दररोज सकाळी रिडींग देणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दिवसातून एकवेळ प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी या केंद्राला भेट देऊन रुग्णाची तपासणी करतील, कोरोना रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, अशी सोय करणेत आली आहे. सध्या २ कोविड बाधीत रुग्ण येथे दाखल झाले आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group