हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. या सगळ्या परिस्थिती संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी माध्यमांनी चर्चा केली असता त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज्यातील जनतेने संयम आणि शांतता राखावी. कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये. अशा परिस्थितीत सर्वांनी सामाजिक ऐक्य राखून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती दिलीप वळसे पाटील यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी होईल. अधिक तपास केला जाईल आणि चुकी असणाऱ्याला कठोर शिक्षाही करण्यात येईल असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
हिंसाचार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून त्या दृष्टिकोनातून पोलिसांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत. इतकंच नाहीतर ज्यांनी कोणी लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं त्यांच्यावर कठोर कारवाई होणार, त्यांना माफी मिळणार नाही असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.