कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्र बंद हा 9 शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडले गेलेले त्याच्यासाठी आणि केंद्राने शेतकरी विरोधी केलेले कायदे याच्या विरोधात आहे. आता ज्यांचा या बंदला विरोध आहे, त्यांचा शेतकरी विरोधी कायद्यांना मान्यता आहेत असेच म्हणावे लागेल असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाव न घेता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई यांनी आज कराड शहरातील बंदोबस्ताची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मनसेने या बंदला विरोध केला असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. मंत्री देसाई म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केले आहेत, त्याविरोधात उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. ते आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारमध्ये एका राज्यमंत्र्यांच्या मुलाकडून नऊ शेतकऱ्यांना गाडी अंगावर घालून चिरडण्यात आले. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात फिरावे
विरोधी पक्षनेते फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बंदला प्रतिसाद मिळालेला नाही, बंद फसला आहे, या वक्तव्यावर मंत्री देसाई म्हणाले, विरोधक जर सातारा जिल्ह्यात आले, तर त्यांना बंदला प्रतिसाद आहे की नाही हे कळेल. सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी 100 टक्के बंद पाळला आहे. विरोधकांना केवळ महाविकास आघाडीवर टीका करणे, महाविकास आघाडीने एखादा विषय हातात घेतला की तो कशा पध्दतीने हाणून पाडता येईल एवढेच पाहतात. विरोधकांचा त्याला विरोध असेल, तर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जो महाराष्ट्रातील जनतेने बंदला पाठिंबा दिला आहे, तो त्यांना मान्य नाही, असाच त्याचा अर्थ काढावा लागेल.