तोंड लपवायला जागा न उरलेल्या गृहमंत्र्यांनी आतातरी राजिनामा द्यावा : आशिष शेलार यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणावर सुनावणी झाली. परमबीर सिंग यांचा आरोप गंभीर असून याबाबत सीबीआय चौकशी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून भाजप अजून आक्रमक झाली आहे. भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीहि
ट्विट करून ‘आता तोंड लपवायला जागा न उरल्याने नैतिक जबाबदारी स्विकारुन गृहमंत्र्यांनी राजिनामा द्यावा. तसेच एवढे दिवस तोंडावर “मास्क” लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे !’ अशी टीका केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपावर मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवलं आहे. इतकंच नाही तर सीबीआयच्या प्रमुखांना या प्रकरणाचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हा आदेश दिला. जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती.

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय देशमुख यांच्यासाठी धक्का आहे. याबाबत भाजपच्या अनेक मंत्र्यांकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

You might also like