अजूनही होतोय जातीभेद ? दलित असल्याने नाकारले घर, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

औरंगाबाद – पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना चळवळीचे केंद्र असलेल्या औरंगाबादेत घडली आहे. उच्च न्यायालयातील एका वकिलाला दलित असल्याने घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पाच जणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उच्च न्यायालयात वकिली करणारे महेंद्र गंडले यांना शहरातील उच्चभ्रू सोयायटीत केवळ दलित असल्याने घर नाकारले गेले. यामुळे या प्रकरणातील पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबादेतील हिरापूरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या साईटवर ॲड. गंडले कुटुंबीयासह गेले होते. त्यांनी बांधकाम विकासकाला घर दाखवण्यास सांगितले. यावेळी एका कर्मचाऱ्याने त्यांना तुम्ही कोणत्या जातीचे आहात असा प्रश्न विचारला. यावर गंडले यांनी आश्चर्य व्यक्त केले. अनुसूचित जमातीचा असल्याचे त्यांनी सांगताच कर्मचाऱ्याने त्यांना घर दाखवायला टाळाटाळ केली. आम्ही तुम्हाला घर देणार नाही, असे सांगत त्याने त्यांना जायला सांगितले.

यानंतर ॲड. गंडले यांनी थेट चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून पाच जणांविरोधात ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील प्रकरणाचा तपास चिकलठाणा पोलिस करित असल्याचे सांगितले जात आहे