सातारा | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्यकृती करणाऱ्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 8) हा गौरव करण्यात आला.
पोषण अभियानमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे (ऑनलाईन), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रधान सचिन श्रीमती आय. ए. कुंदन, आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात जास्तीत जास्त उपक्रम म्हणजेच सर्वोत्कृष्ट कार्यकृती करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सातारा जिल्ह्याने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात इथून पुढे देखील सातारा जिल्हा परिषद जास्तीत जास्त विधायक दृष्टिकोन ठेवून उपक्रम राबवून जिल्ह्याचा नावलौकिक कायम ठेवा असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.