कंटेनर-टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक वसाहतीकडून नगरकडे भरधाव जाणारा कंटेनर व लिंबेजळगावकडून पंढरपूरकडे जाणारा आयशर टेंपो यांच्यात भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात वाळूज जवळील गरवारे गेट समोर सोमवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की, एका कंटेनरचे दोन‌ तुकडे झाले.

बँटको रोडलाईन्सचा आयशर टेम्पो (एमएच 20 ईजी 0945) हा वाळुजकडून पंढरपूरकडे जात होता. गरवारे कंपनी समोर दुपारी झालेल्या अपघातामुळे पडलेल्या रस्त्यावरील दगडावर हा टेम्पो गेल्याने चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला. त्यामुळे हा भरधाव टेंपोविरुद्ध दिशेला गेला त्याच वेळी पंढरपूरकडून वाळुजकडे कंटेनर (आरजे 04 जीए – 8166) लोखंडी रोल घेऊन येत होता. भरधाव असलेली ही दोन्ही वाहने एकमेकांवर समोरासमोर जोरात धडकली. त्यामुळे आयशर टेम्पो पलटी झाला. तर कंटेनरचे दोन तुकडे होऊन लोखंडी रोल खाली पडला. सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात आयशर टेम्पो चालक शेख जावेद शेख रमजानी (रा. गल्लेबोरगाव, ता. खुलताबाद) याचा जागीच मृत्यू झाला. तर कंटेनर चालक गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच नायगाव-बकलालनगर येथील युवा सेनेच्या रुग्णवाहिकेने धाव घेत जखमीला उपचारार्थ औरंगाबाद येथील घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शेख जावेद यास तपासून साडेबारा वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. तर जखमी कंटेनर चालकाचे हात व पाय निकामी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.