Wednesday, October 5, 2022

Buy now

भरधाव ट्रक-रिक्षाचा भीषण अपघात; दोन ठार

औरंगाबाद – भरधाव आयशर ट्रक आणि रिक्षात जोरदार टक्कर होऊन रिक्षा चालकासह दोन जण ठार झाले. तर किरकोळ जखमी झालेल्या ट्रक चालकाने मात्र पळ काढला. ही घटना वरुड काजी ते शेंद्रा एमआयडीसी रस्त्यावरील मांडकी कमानीजवळ काल रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. रिक्षाचालक ज्ञानेश्वर विष्णू जाधव आणि आनंद गायकवाड अशी मृतांची नावे आहेत.

रिक्षाचालक जाधव हे त्यांच्या रिक्षात (एम एच 20 इ एफ 4447) प्रवासी गायकवाड यांना बसवून वरुड काजी कडून शहराकडे येत होते. यादरम्यान रात्री दहा वाजेच्या सुमारास समोरून वेगाने आलेला ट्रक वरुड काजी कडे जात होता. या दोन्ही वाहनात मांडकी कमानी जवळ जोराची धडक झाली. रिक्षाचा चुराडा होऊन चालक ज्ञानेश्वर सहप्रवासी गायकवाड जागीच ठार झाले. त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, अपघातग्रस्त दोघांना घाटीत नेले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा रात्री बारा वाजेपर्यंत अधिकारी आणि कर्मचारी करत होते.