फलटण शहरांसह हाॅटस्पाॅट गावे सात दिवस कटेंटमेंट झोन म्हणून जाहीर ः प्रांताधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण शहरांप्रमाणेच तालुक्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असेलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव ही गावे सुध्दा कटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

फलटण तालुक्यात कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. कटेंटमेंट झोन जाहीर केलेल्या गावामध्ये मेडीकल व दवाखाने वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा बंद राहणार आहेत. दि. २ मे ते ८ मे या गावातील अत्यावश्यक सेवेसह सर्व बाबी ह्या बंद राहणार आहेत. दुध, भाजीपाला व किराणा दुकाने यांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने घरपोच करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.

बाजार समिती, साखर कारखानाही बंद राहणार ः मुख्याधिकारी

फलटण शहरामध्ये सुमारे एक हजार ऍक्टिव्ह रुग्ण असल्याने संपूर्ण फलटण शहर हे सात दिवसासाठी बंद राहणार आहे. संपूर्ण फलटण शहर हे कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून या मध्ये भाजी मंडई, किराणा दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समितीसह श्रीराम सहकारी साखर कारखाना सुद्धा बंद राहणार आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.