सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आसनगाव, धनावडेवाडी, कुसावडे, वेचले, मांडवे या गावांमध्ये रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बंद घरे, दुकाने लक्ष्य करत चोरटयांनी हात साफ केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आसनगाव येथे मेडिकल, दवाखाना व बंद घरे यांचे कुलूप फोडून आत प्रवेश केला, मात्र, या ठिकाणी जास्त काही चोरट्यांच्या हाती लागले नाही. धनावडेवाडी येथे दुकान व बंद घरे फोडत सुमारे 15 हजारांची रोकड व काही दागिने चोरट्यांनी लंपास केले. कुसवडे आणि मांडवे, वेचले येथे ही चोरट्यांनी हाच फंडा वापरला असून कुसवडे येथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
दरम्यान, घरफोडीमध्ये किती मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला याची माहिती पोलीस शुक्रवारी उशिरापर्यंत घेत होते. मात्र एकाच रात्रीत झालेल्या घरफोड्यांनी बोरगाव पोलिसांपुढे चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या घटनेनंतर आसनगाव भागात पोलिसांनी रात्र गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.