हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकल नवीन घर खरेदी करणं म्हणजे काय सोप्पी गोष्ट नाही… आयुष्यभराची कमाई त्यासाठी खर्च करावी लागतेय. त्यातच घराच्या किमती इतक्या गगनाला भिडल्या आहेत कि सर्वसामान्य माणसाला तर नवीन घर खरेदी करणं म्हणजे एक स्वप्नच राहील आहे. परंतु तुम्हला कोणी म्हंटल कि फक्त १०० रुपयांत घर मिळतंय तर?? खोटं वाटतंय ना? पण हे खरं आहे…. हिरव्यागार निसर्गाने समृद्ध असलेल्या फ्रान्समध्ये तुम्हाला हे घर खरेदी करण्याची संधी आहे. मात्र यासाठी काही अटी आणि नियम तुम्हाला पाळावे लागतील. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
100 रुपयांत कसं शक्य आहे ?
फ्रान्सच्या मध्यवर्ती भागात, पुय-दे-डोम येथे असलेले अम्बर्ट मध्ये हि घरे तुम्ही घेऊ शकता. इतक्या स्वस्तात तयार घरे देण्यामागेही काही कारणे आहेत. अम्बर्टची लोकसंख्या एकेकाळी जास्त होती, परंतु हळूहळू येथील घरे रिकामी होत आहेत. अनेक परिसरात ६०% पेक्षा जास्त घरे रिकामी आहेत. यामुळेच स्थानिक प्रशासनाने या ऐतिहासिक शहराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक अनोखी योजना सुरू केली आहे, जेणेकरून नवीन लोक येथे येतील, स्थायिक होतील आणि एक नवीन समुदाय तयार होईल. म्हणूनच सुरवातीला फक्त १०० रुपयांत याठिकाणी राहण्यासाठी घर दिले जात आहे. मात्र इथेही काही अटी आहेत.
काय आहेत अटी?
तुम्हाला जरी १०० रुपयांत घर मिळत असलं तरी तुम्हाला त्या घराचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी तुम्हाला €20,000 ते €50,000 (सुमारे 18 ते 45 लाख रुपये) खर्च करावे लागू शकतात. परंतु चांगली गोष्ट म्हणजे स्थानिक प्रशासन तुम्हाला कमी व्याजदराचे कर्ज आणि नूतनीकरण अनुदान यासारखी आर्थिक मदत देखील करेल.
आणखी एक बाब म्हणजे कोणीही याठिकाणी घरे खरेदी करू शकतो, मग तो फ्रेंच नागरिक असो किंवा परदेशी… परंतु तुम्हाला तिथे किमान 3 वर्षे राहावे लागेल. कारण इथल्या प्रशासनाचा हेतूच हा आहे कि, लोकांनी याठिकाणी स्थायिक व्हावं. त्यामुळे तुम्ही फक्त गुंतवणूक म्हणून याकडे बघू शकत नाही, तर तुम्हाला इथे राहावं लागेल. जर तुम्ही घर खरेदी करून ते भाड्याने देण्याच्या मनस्थितीत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी नाही. जर तुम्ही ही अट पूर्ण केली नाही तर सरकारी अनुदान तुमच्याकडून काढून घेतले जाऊ शकते. तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो.




