खाऊ गल्ली | महाराष्ट्रात आणि भारत वेगवेगळल्या प्रदेशात पोह्याचे वेगवेगवेळे प्रकार पाहण्यास मिळतात. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पोपट पोहे, कोबी पोहे, बटाटा पोहे हे प्रकार लोकप्रिय आहेत. तर मटकीचे शांम्पल अथवा सांबर टाकून कांदा पोहे खाणे हि पुणेकरांची खास ओळख आहे. त्या पोह्यालाच पुणेरी पोहे सुद्धा संबोधले जाते. तर मूळचा कर्नाटकचा असलेला परंतु सोलापुरात प्रसिद्धी पावलेला खाद्य प्रकार म्हणजे सुशीला पोहे. यापोह्याची चव देखील न्यारीच आहे. तर कोकणात बघायला मिळणार दडपी पोहे हा खाद्य पदार्थ देखील अलीकडे सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे.
दडपी पोहे बनवण्याचे साहित्य
जाड पोहे : ३ वाट्या, खिसलेले खोबरे : १ वाटी, कोथिंबिर, चिरलेला कांदा, चिरलेले टोम्याटो, लिंबाचा रस,हळद, मोहरी, हिंग, साखर, मीठ, शेंगदाणे, ओल्या नारळाचे पाणी,
दडपी पोहे बनवण्याची कृती
एका खोलगट भांड्यामध्ये निवडलेले ३ वाटी पोहे घ्यावेत. त्यात एक वाटी खिसलेले ओले खोबरे घालावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, दोन चमचे लिंबाचा रस, साखर कोथिंबीर, चिरलेले टोम्याटो, चिरलेला कांदा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर त्यात पोहे किंचित ओले होतील एवढे ओल्या नारळाचे पाणी घालावे आणि मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यावे.
एका भांड्यात तेल तापायला ठेवावे. त्यात मोहरी, हळद, हिंग, थोडीशी कोथिंबीर घालून फोडणी बनवावी. त्यानंतर पोह्याचे जे मिश्रण तयार केले आहे त्या मिश्रणावर हि फोडणी ओतावी आणि पोहे दडपून ठेवावेत. पोहे पाच मिनिट दडपल्या नंतर त्यात तळलेले शेंगदाणे मिसळून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि सर्वाना पानात वाढावे.