धक्कादायक! बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर मातेमुळे कराडात त्या ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली होती. आता बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर मातेमुळे कराडातील त्या ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता व 1 निकट सहवासित असे एकूण 8 नागरिकांचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

प्राथमिक तपासण्यानंतर या सर्वांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागू असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालू आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन कष्टाची पराकाष्ठा करत आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने नागरिकांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेषकरून कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असलेने कराड शहर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल तर घरातून बाहेर पडणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या सातारा जिल्ह्यात एकूण 52 कोविड-19 बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

You might also like