गेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारने किती प्रकल्प आणले?पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सातारा प्रतिनिधी । ‘मी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे कामे मुख्यमंत्री केल्याचे सांगत आहेत. गेल्या पाच वर्षात या सरकारने किती प्रकल्प आणले ते सांगावे’ असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. चव्हाण यांच्या प्रचाराची सांगता आज कराड शहरात झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीचे आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील सुद्धा उपस्थित होते.

यावेळी चव्हाण यांनी भाजपाच्या वरिष्ठ आणि स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभेबाबत चव्हाण यांनी जोरदार टीका केली. मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राच्या विकासावर लोकांच्या पोटापाण्याच्या मुद्द्यावर बोलले नाहीत.

निवडणूक महाराष्ट्राची आहे काश्मिरची नाही, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला. लोकसभा न लढवल्याने होत असलेल्या होत टीकेला उत्तर देताना आपण देशातील चार ही सभागृहाचा सदस्य म्हणून काम केलं आहे. निवडणुकीची भिती मला नाही. मी रडणारा नसल्याचे ही त्यांनी ठणकावून सांगितले. पश्चिम महाराष्ट्रावर या सरकारने अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.