हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारत सरकार गरीब नागरिकांना मोफत रेशन देत असली तरीही त्यासाठी वैध रेशनकार्ड (Ration Card)असणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर, सरकारने सर्व रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ही प्रक्रिया ठरलेल्या वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितांचे रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
फसव्या ई-केवायसी संदेशांपासून सावध राहा
ई-केवायसी प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत, अनेक नागरिक त्याच्या जाळ्यात अडकत आहेत. अलीकडे अनेक रेशनकार्ड धारकांना फोन किंवा मेसेजद्वारे संपर्क साधला जात आहे. या संदेशांमध्ये ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशनकार्ड रद्द होईल, अशी भीती दाखवली जाते. त्यानंतर कार्डधारकांना भ्रामक लिंक्सवर क्लिक करण्यास सांगितले जाते, जिथे त्यांच्या वैयक्तिक आणि बँक खात्याशी संबंधित माहिती चोरी केली जाते. अशा प्रकारांमध्ये अनेक लोक आपले बँक खाते रिकामे करून घेत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळख्या लिंकवर क्लिक करू नये आणि संशयास्पद कॉल्सना प्रतिसाद देऊ नये.
डीलर्सकडून बेकायदेशीर शुल्क वसुलीचा प्रकार
सरकारने ई-केवायसी प्रक्रिया मोफत ठेवली असली तरी काही ठिकाणी रेशन दुकानदार किंवा एजंट नागरिकांकडून बेकायदेशीर शुल्क वसूल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांकडून १० ते ५० रुपये घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. नागरिकांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की, ई-केवायसी ही पूर्णपणे विनामूल्य सेवा आहे आणि कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. जर कोणी शुल्क मागत असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे गरजेचे आहे.
ई-केवायसी प्रक्रिया
ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी रेशनकार्ड धारकांनी त्यांच्या जवळच्या सरकारी रेशन दुकानाला भेट द्यावी. तेथे असलेल्या पॉइंट ऑफ सेल (POS) मशीनद्वारे फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन किंवा OTP च्या मदतीने प्रक्रिया पूर्ण करता येते. यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत. एकदा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ई-केवायसी नोंदणी विनामूल्य केली जाते. सरकारने रेशन दुकानदारांवर या प्रक्रियेवर देखरेख करण्याची जबाबदारी सोपवली आहे आणि त्यांनी कोणत्याही नागरिकाकडून शुल्क घेता कामा नये. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नका आणि फसवणुकीपासून सावध राहा.
दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सतर्कता आवश्यक आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळख्या नंबरवरून आलेल्या कॉल्स किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये. तसेच, अधिकृत माहिती मिळवण्यासाठी सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.