हॅलो कृषी ऑनलाईन । जमिनीचा सातबारा उतारा हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. जो जमिनीच्या अनेक व्यवहारांसाठी आवश्यक असतो. मात्र सातबारा उतारा काढण्याच्या पद्धती वेळखाऊ असल्याने तो काढायचा म्हणजे वैताग येतो. पण आता सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या खेटा घालण्याची गरज भासणार नाही, कारण डिजिटली सातबारा उतारा आता काढता येणार आहे. घरच्या घरी डिजिटली सातबारा उतारा काढता येणार आहे. तो कसा काढायचा याबाबत जाणून घेवूया. महसूल विभागाने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे शासकीय तसेच पतसंस्था आणि बँकांच्या कार्यालयामध्ये अशा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा चालणार असल्याची माहितीही जाहीर करण्यात आली आहे. म्हणूनच असा उतारा कसा काढायचा याची माहिती जाणून घेवूया.
१. सर्वप्रथम गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in या साईटवर जायचे आहे.
२. महाराष्ट्र सरकारची महसूल विभागाची वेबसाईट उघड होईल.
३. वेबसाईटवर उजवीकडे Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करायचे आहे. म्हणजे ‘आपला 7/12’ नावाचे एक नवीन पेज समोर येईल.
४. या वेबसाईटवर जर आधीच नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून या साईटवरील सेवांचा लाभ घेता येतो. मात्र, पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी ही साईट उघडली असेल तर मोबाईल क्रमांक वापरूनही सातबारा उतारा काढता येतो.
५. मोबाईल क्रमांक वापरून सातबारा काढण्यासाठी OTP Based Login या पर्यायावर क्लिक करायचे.त्यानंतर Enter Mobile Numberच्या खालच्या रकान्यात मोबाईल नंबर टाकायचा. आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचचे.
६. या पर्यायावर क्लिक केले की, OTP sent on your mobile असा मेसेज येईल.
७. मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे Enter OTPच्या खालच्या रकान्यात टाकायचे.
८. त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचे.
९. समोर आपला सातबारा नावाने एक नवीन पेज उघडले जाईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतात.
१०. यातील Digitally signed 7/12 या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे. त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असे शीर्षक असलेले पेज समोर उघडले जाईल. यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, सातबाऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील. नवीन रेजिस्ट्रेशन केलेले असल्यामुळे आपल्या खात्यात इथे काही बॅलन्स नसतो. त्यामुळे खाली दिलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अप असेल तर त्याद्वारे पैसे जमा करता येऊ शकतात.
११. त्यानंतर डिजिटल सातबाऱ्याच्या फॉर्मवर परत जावून, अकाऊंट वर जमा झालेले पैसे भरायचे. आता डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी फॉर्मवर दिलेली माहिती भरायची.
१२. यामध्ये जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव निवडायचे. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड पर्यायावर क्लिक करायचे.
१३. त्यानंतर डाऊनलोड झालेला सातबारा स्क्रीनवर दिसेल. यावर स्पष्ट लिहिलेले असते की, हा सातबारा डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.
अशाप्रकारे आपल्या मोबाईल क्रमांकावरून डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा काढता येतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’