वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग १

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारताचे माजी राष्ट्रपती, महान संशोधक, भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ८८ व्या जन्मदिवसानिमित्त ग्रामीण भागातील तरुण तरुणींना ‘वाचन’ याविषयी लिहितं केलं. आपल्या आयुष्यात वाचनाचं महत्व काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न तरुणाईने केला. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांपर्यंत त्यांची ही धडपड पोहचवत आहोत.

मला आवडलेलं पुस्तक – टू द लास्ट बुलेट
मुस्कान बाळू डांगे

हे पुस्तक तरुणांच्या दृष्टीने प्रेरणादायक आहे. ही एक अतिरिक्त सामान्य कथा आहे. अशोक कामटे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पूर्व विभाग, मुंबई, ज्यांचा मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना मृत्यू झाला होता. भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) मधील सर्वात धैर्यवान आणि आश्वासक अधिकाऱ्याची प्रेरणादायक कहाणी थेट पत्नी, विनिताच्या हृदयातून येते. नक्षलग्रस्त भंडारा जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर किंवा मुंबई येथे असो या पदावर उदाहरणीय शौर्य दाखवलेल्या एका निर्भिड अधिकाऱ्याचं आयुष्य व कारकीर्द यात सापडते. यातून त्यांच्या आयुष्याचा, सेवेचा तपशीलदेखील समोर आला आहे ज्यामुळे बर्‍याच तरुणांना प्रेरणा मिळेल.

मुंबईवरील दहशतवादी हल्ले मुख्यत्वे ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, नरिमन हाऊस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) या ठिकाणी झाले होते. या सर्वांच्या बरोबरीने कामा रुग्णालयाची घटना ही सर्वात घट्ट व निर्णायक ठरली. अजमल कसाबला जखमी अवस्थेत जिवंत पकडण्यात आलं. महाराष्ट्र पोलीस दलातील तीन अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांच्यासह १० हुन अधिक लोकांनी मुंबईच्या रक्षणासाठी अंतिम बलिदान दिलं. अशोक कामटे यांना देशाच्या बलिदानाबद्दल अभिवादन करते आणि हे पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी विनीता कामटे व विनीता देशमूख यांचे आभार मानते.

WhatsApp Image 2019-10-14 at 15.45.11
मुस्कान बाळू डांगे (यंत्र अभियांत्रिकी) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड.

विचार कसा करायचा ते शिकलो..!! – विकास चव्हाण

वाचन करण्यातून पहिल्यांदा आपली विचार करण्याची पद्धत सुधारते. आपण दूरदृष्टी ठेवून त्यावर काम करत राहतो. एखादी ज्यादा माहिती आपल्या अशी उपयोगी येते की जणू नशिबच उघडते. वाचन करण्यातून माणसांची योग्य पारख करता येते. आपली विचारधारा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली वागणुक असते. ही वागण्याची पद्धत बदलण्यासाठी पुस्तकांचा खुप फायदा होतो. बऱ्याचदा अंगी कला आहे जिद्द आहे पण लढण्यासाठी लागणारा आत्मविश्वास नसतो हा विश्वास आपल्यात पुस्तक भरू शकत. निर्णय घेण्यासाठी ताकद हवी असते आणि मला ती ताकद पुस्तक देत आहे.

WhatsApp Image 2019-10-14 at 13.53.42
विकास चव्हाण, बी.एस्सी. भाग २ वायसी कॉलेज, सातारा

—————————————————————————————————————————————–मेंदूच्या भुकेसाठी वाचन हेच जेवण – आकाश सुनंदा लक्ष्मण थिटे

वाचनाने मला काय दिले यापेक्षा मी हे सांगेन की, वाचनातून मी काय घेतले. वाचनातून खूप काही माहिती मिळते, अनुभव मिळतात, आपण विचार करायला लागतो , समाजात काय चाललय, ते चुकीचे का बरोबर अशा अनेक गोष्टी वाचनातून मिळत असतात पण यातले आपण काय घेतो हे महत्वाचे….!

मी दहावी-अकरावी पर्यंत पुस्तकी किडा होतो. इतर वाचून काय मिळणार ? याच्यात आपला वेळ वाया जाणार व शाळेचा अभ्यास बुडणार असे वाटायचे व अवांतर वाचनाला हातच नाही लागला. पण नंतर कॉलेजला घरातून बाहेर पडलो आणि हळूहळू बाहेरच्या जगाची ओळख होऊ लागली. मग कुठेतरी वाटू लागले की, वाचन करायला पाहिजे.
मग काही छोटी छोटी पुस्तके वाचली, वर्तमानपत्रातील लेख वाचू लागलो, त्यावर विचार करू लागलो. वाचनातून आपल्याच जवळच्या पण आपल्याला माहित नसणार्‍या बर्‍याच गोष्टी कळतात. आपल्या चुका आपल्याला लक्षात येऊ लागतात व आपण त्या सुधारण्याचा प्रयत्न करत राहतो. वाचनातून आणखी एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे आपण आपले विचार करायला लागून ते विचार लिहायलाही लागतो. आपण लिहिते बनतो.

आपण जसे दररोज शरीराच्या भुकेसाठी जेवण करतो तसेच मनाच्या, मेंदूच्या भुकेसाठी वाचन हेच जेवण आहे. जेव्हा वाचन चालू ठेवतो तेव्हा सतत काहीतरी नवीन विचार, कल्पना सुचतात व आयुष्य जगताना आणखी मजा येते. सतत काहीतरी कार्य करत रहावे असे वाटते. जेंव्हा थोरामोठ्यांचे साहित्य वाचतो तेव्हा आपण माणूस म्हणून कसे जगले, वागले पाहिजे हे कळत जाते. वाचनातून सतत एक गोष्ट वाटत राहते की, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण सदैव काहीतरी देणेकरी आहोत. समाजातील बरेचजण सर्वसामान्य जीवन जगत असतातच, पण आपण काहीतरी नवीन करावे, वेगळ्या पद्धतीने जीवन जगावे असे फक्त वाचनामुळे वाटते. वाचनातून आणखी एक गोष्ट मी शिकलो. आपण आपल्या विचारांची उंची जशी जशी वाढवत जातो तसे आपण ‘साधी राहणी पण उच्च विचारसरणी’चे व्यक्ती बनत जातो. या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या अस्तित्वात आणण्यासाठी वाचन मात्र सतत चालू ठेवावे लागते. मला वाटते की, प्रत्येकाने दररोज काहीना काही तरी वाचलेच पाहिजे.

वाचनाशिवाय आनंदाचे जगणे नाही ….
आणि आनंदच्या जगण्याशिवाय जगणे नाही….!!

WhatsApp Image 2019-10-14 at 14.58.48
आकाश सुनंदा लक्ष्मण थिटे बी.एस्सी भाग १, वायसी कॉलेज, सातारा

—————————————————————————————————————————————–

Leave a Comment