हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिलेला आहे. या चित्रपटातील मुन्ना हा अनेक प्रयत्नानंतर डॉक्टर होतो आणि आपल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जादू की झप्पी हा रामबाण उपाय शोधून काढतो. मुन्नाच्या म्हणण्यानुसार, एखादा व्यक्ती कितीही दुःखात, चिंतेत किंवा नैराश्यात असला तर त्याला फक्त एक मिठी मारावी. त्यामुळे तो दुःख आणि नैराश्यातून बाहेर येतो. हे झाले एका चित्रपटातील पात्राचे मत. परंतु आता खुद्द वैज्ञानिकांनी देखील सांगितले आहे की, एक मिठी व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढू शकते, त्याच्या वेदना कमी करू शकते.
गेल्या 212 वेळा करण्यात आलेल्या विविध संशोधनातून असे आढळून आले आहे की, मिठी आणि इतर प्रकारचे शारीरिक स्पर्श सर्व वयोगटातील लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांवर एका औषधाप्रमाणे काम करते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मिठी सर्वाधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे एखादा व्यक्ती त्याच्या दुःखातून, नैराश्यातून ही बाहेर येऊ शकतो. याबरोबर, त्या व्यक्तीचे दुःख, नैराश्य मिठी मारल्यामुळे कमी होऊ शकते.
नुकत्याच करण्यात आलेल्या या संशोधनात जर्मनीतील रुहर युनिव्हर्सिटी बोचम आणि नेदरलँड्स इन्स्टिट्यूट फॉर न्यूरोसायन्स यांचा समावेश होता. या संशोधनासंदर्भात माहिती देताना न्यूरोसायंटिस्ट ज्युलियन पॅकहेझर यांनी सांगितले की, “आरोग्याचा संबंध हा स्पर्शाशी असल्याचे आम्हाला माहीत होते. परंतु त्याचा चांगल्या प्रकारे वापर कसा करायचा? यातून कोणते परिणाम अपेक्षित आहेत आणि यावर प्रभाव पाडणारे घटक कोणते आहेत? याबाबत सुनिश्चितता नव्हती.
संशोधनात काय आढळले?
नेचर ह्युमन बिहेविअरमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनातून समोर आले आहे की, स्पर्शामुळे वेदना, नैराश्य आणि चिंता कमी होण्यास मदत होते. त्याचा सकारात्मक परिणाम मुले आणि प्रौढ दोघांमध्ये दिसून आला आहे. तसेच, डोक्याला किंवा चेहऱ्याला स्पर्श करणे ही तितकेच फायदेशीर ठरते. यासह, मानव आणि प्राणी यांचे स्पर्श शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या फायदेशीर ठरतात. इतकेच नव्हे तर, नवजात अर्भकांला मायेने करण्यात आलेला नाजूक स्पर्श ही त्याच्यासाठी तितकाच फायदेशीर ठरतो. यात पालकांकडून करण्यात आलेला स्पर्श अधिक सकारात्मक ठरतो.