कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प बाधीत शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात खा. श्रीनिवास पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल संबंधित शेतक-यांनी त्यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी गोटे, कराड येथील लोकसेवा कार्यालयात खा. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील जिराईत जमीन बागायत होणार असली तरी, या योजनेचे पूर्ण क्षमतेने पाणी अडवल्यानंतर कराड, मलकापूर, सुपने, पश्चिम सुपने, येरवळे, किरपे आदी गावांतील नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांची सुपीक जमीन बाधित होणार आहे. या बुडीत जमिनींचा सर्व्हे 2019 रोजी झाला होता. त्यानंतर नऊ वर्षे शेतकऱ्यांना जमिनीची नुकसान भरपाई देऊन जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ठप्प होती. मात्र यानंतर उपसा सिंचन योजना प्रशासनाने खासगी वाटाघाटीने व थेट खरेदीने बाधित जमिनीची खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आधिपत्याखाली समिती नेमून तशी सूचना ऑगस्ट 2020 ला प्रसिद्ध केली. शेतक-यांची संमतीपत्रे, उतारे, कागदपत्रे मागवले. मात्र कोरोना संकटामुळे ही प्रक्रिया धीम्या गतीने सुरू होती. त्यानंतर सप्टेंबर 2021 ला फेरअधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. तरीही कागदोपत्री अडचणीमुळे ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.
प्रशासनाच्या अधिसूचनेत सुपने व पश्चिम सुपने येथील 203 शेतक-यांची जमीन बाधित होत आहे. परंतू या दोन्ही गावांतील अन्य 12 शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत असूनही त्यांचा समावेश जमीन अधिग्रहणात नव्हता. परिणामी हे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार होते. ही बाब सुपने गावचे शेतकरी शिवाजी पाटील व इतर शेतक-यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली. याबाबत टेंभूचे कार्यकारी अभियंता व प्रातांधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर जमिनीचा फेर सर्व्हे करण्यात आला. नुकतीच कराड शासकिय विश्रामगृह बाधित शेतक-यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये बुडीत जमिनीचा शासकीय खरेदी दर 90 हजार रुपये प्रतिगुंठ्याने निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे. सुपने व पश्चिम सुपने येथील शेतक-यांनी खा. श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन बाधीत शेतकऱ्यांना जमीन मोबदला देण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी, तसेच वंचिंत शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करून त्या जमिनीची मोजणी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.