कोरोनाच्या आधी देशातील उपासमारच आम्हाला मारुन टाकेल; हातावरचं पोट असणाऱ्यांची घराबाहेरील व्यथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना घरांमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. पण रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी हा पर्याय नाही. मंगळवारच्या घोषणेनंतर हे लोक कसे याला सामोरे जात आहेत याची माहिती बी.बी.सी इंग्रजीचे पत्रकार विकास पांडे यांनी घेतली आहे. त्याचा मराठी वाचकांसाठी अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. लेखातील छायाचित्र विकास पांडे आणि विकास सिंग यांनी घेतली आहेत.

नोएडातील मजूर चौकात शेकडो लोक बांधकाम मजूर म्हणून काम शोधत असतात. दिल्लीच्या उपनगरातील हा चौक म्हणजे बांधकामासाठी मजूर शोधणाऱ्यांसाठी एक हॉटस्पॉट आहे. जिथे हे लोक मजूर शोधण्यासाठी येत असतात. रविवारच्या एका दिवसाच्या संचारबंदी वेळी त्या परिसरातून गेलो असता खूप शांतता होती. सारे काही स्तब्ध होते. इथल्या कोलाहालात कधीच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येईल याची कुणी कधी कल्पनाच केली नसती. मला विश्वासच बसत नाही की मी तो आवाज ऐकला. 

लवकरच एका कोपऱ्यात मला काही गोंधळ करणाऱ्या माणसांचा  गट दिसला. मी सुरक्षित अंतर ठेवून त्यांना ते संचारबंदीचे पालन करत आहेत का विचारले. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून आलेला रमेश कुमार म्हणाला, “आम्हाला माहित आहे आम्हाला कुणी कामावर घेणार नाही पण तरीही आम्ही प्रयत्न करत आहोत.” तो म्हणाला, “मी दिवसाला ६०० रु (८ डॉलर, ६.४० युरो) कमावतो. ज्यावर माझ्या घरातल्या ५ लोकांचा उदरनिर्वाह होतो. कोरोना विषाणूचा धोका आम्हाला माहीत आहे. पण माझ्या घरातील अन्न  पुढच्या काही दिवसात संपल्यानंतर मी माझ्या मुलांची उपासमार पाहू शकणार नाही.”

किशन लाल – हातरिक्षाचालक

रोजंदारीवर काम करणारे असे लाखो लोक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या घोषणेनुसार पुढचे तीन आठवडे संचारबंदी राहील. तोपर्यंत या लोकांना आता कामाची अपेक्षा नाही. त्यांच्याकडे असणारे अन्न येत्या काही दिवसातच संपेल. 
भारतामध्ये आतपर्यंत ५०० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १० लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तरेतील उत्तरप्रदेश, दक्षिणेतील केरळ आणि देशाची राजधानी दिल्ली या राज्यांमध्ये राज्य सरकारने कुमार यांच्यासारख्या नागरिकांच्या खात्यावर थेट पैसे जमा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि संचारबंदीमुळे नुकसान भोगाव्या लागणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पण यामध्ये काही तार्किक आव्हाने आहेत.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते, भारतात ९०% कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करतात. यामध्ये सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, रिक्षा चालक, रस्त्यावर धंदा  करणारे विक्रेते, कचरा गोळा करणारे कामगार तसेच घरगुती कामे करणारे यांचा समावेश होतो. बहुतेकांना पेन्शन, आजारी रजा, पगारी रजा, किंवा कोणत्याच प्रकारचा विमा मिळत नाही. बऱ्याच लोकांचे बँकेत खातेसुद्धा नाही आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हे लोक रोख रकमेवर अवलंबून असतात. तांत्रिक दृष्ट्या जिथे काम करावे लागते अशा ठिकाणी आपले मूळ ठिकाण सोडून स्थलांतरित झालेले बरेच लोक आहेत. काम शोधण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरणाऱ्या आणि एका ठिकाणी फार काळ न राहण्याऱ्या अशा तरंगत्या लोकसंख्येच्या अनेक समस्या आहेत. 

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘यापूर्वीच्या कोणत्याच सरकारला अशा आव्हानाला सामोरे जावे लागले नाही’ असे सांगत हे एक फार मोठे आव्हान असल्याचे मान्य केले. ‘सर्वच सरकारांना विजेच्या वेगाने गती वाढविण्याची गरज आहे. कारण ही  परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे. आपण मोठ्या प्रमाणातील सामुदायिक स्वयंपाकघरे सुरु करून गरज असणाऱ्या प्रत्येकाला अन्न  पोहचवले पाहिजे. कोण कोणत्या राज्यातून आले आहे याची पर्वा न करता सर्व गरजू लोकांना तांदूळ, गहू आणि रोख रक्कम पुरविली पाहिजे’ असे ते म्हणाले. भारतातील सर्वात जास्त म्हणजे अंदाजे २२ कोटी लोकसंख्या असणाऱ्या त्यांच्या राज्यासाठी ते विशेष चिंताग्रस्त आहेत. ‘आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणाऱ्या लोकांना थांबविले पाहिजे तसेच इतर अन्न पुरवठ्याची सुरक्षित व्यव्था केली पाहिजे, नाहीतर अशावेळी खेडेगावांमध्ये लोक जास्त गर्दी करतात.’ असंही त्यांनी पुढं बोलताना सांगितलं.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, सरकार इतर राज्यातून आलेल्या कामगारांना आणि ज्यांना गरज आहे अशा सर्वांना शोधून त्यांना मदत करत आहे. भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंत सर्व प्रवासी सेवा बंद केल्या आहेत. परंतु २३ मार्चच्या पूर्वी, संचारबंदी सुरु होण्याच्या आधी कोट्यवधी परप्रांतीय कामगार दिल्ली, अहमदाबाद, मुंबई सारख्या उद्रेकग्रस्त शहरातून उत्तरप्रदेश, बिहारसारख्या राज्यतील त्यांच्या गावी प्रवाशांनी भरलेल्या रेल्वेमधून प्रवास करीत होते. 
आणि यामुळेच सामुदायिक प्रसाराचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळेच तज्ञांना पुढचे दोन आठवडे खूप आव्हानात्मक असण्याची भीती वाटते आहे. तथापि प्रत्येकाला त्यांच्या गावी प्रवास करणे परवडणारे नव्हते. 
उत्तरेकडील अलाहाबाद शहरात रिक्षा चालविण्याचे काम करणारे किशन लाल म्हणाले, “मागच्या ४ दिवसात काहीच पैसे कमविले नाहीत. माझ्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला पैसे कमविण्याची गरज आहे. सरकार आमच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे मी ऐकले आहे, पण तरीही ते कधी आणि कसे जमा होतील याची मला काहीच कल्पना नाही.”

किशनलाल – त्यांच्या हातरिक्षा सोबत

त्यांचे मित्र अली हुसेन जे एका दुकानात सफाईचे काम करतात ते म्हणाले, “अन्न विकत घेण्यासाठी माझ्याकडचे सगळे पैसे संपले आहेत. दोन दिवसापूर्वी दुकान बंद झाले आहे आणि मला माझे पैसे अजून मिळाले नाहीत, दुकान कधी उघडेल सांगता येत नाही. आता माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याचीच मला भीती वाटत आहे.”

अली हुसैन – दुकानातील सफाई कामगार

लाखो भारतीय रस्त्यावर व्यावसायिक म्हणून काम करून पैसे कमवितात. हे लोक स्वतः काम करून त्यांच्यासारख्या कामगारांना काम देत असतात. दिल्लीत दूध-दहीच्या पेयांचा छोटा स्टॉल असणारे मोहम्मद साबिर म्हणाले, “उन्हाळयात व्यवसाय वाढेल म्हणून मी नुकत्याच दोन कामगारांची नियुक्ती केली होती,
पण आता मी त्यांना पगार देऊ शकत नाही कारण माझ्याकडेच पैसे नाहीत. माझ्या गावी माझे कुटुंब शेतीतून काही उत्पन्न कमावते, पण यावर्षी गारपिटीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे आणि ते ही  माझ्याकडूनच अपेक्षा ठेवून आहेत. आता मला खूप असहाय्य वाटत आहे. कोरोना विषाणू आधी ही उपासमारच माझ्यासारख्या लोकांना मारून टाकेल.”

मोहम्मद साबीर – शीतपेय विक्रेता

देशातील सर्व स्मारकेही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळं पर्यटनावर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या बऱ्याच जणांवर याचा परिणाम झाला आहे. दिल्लीतील आयकॉनिक इंडिया गेटवर छायाचित्रकार म्हणून काम करणारे तेजपाल कश्यप म्हणाले, “व्यवसायात इतकी घसरण या आधी कधीच पहिली नव्हती. मागच्या दोन आठवड्यात संचारबंदी नसतानाही एखादाच पर्यटक होता. आणि आता तर मी इथे दिल्लीत अडकलो आहे, कामही करू शकत नाही आणि माझ्या गावी परतही  जाऊ शकत नाही. उत्तर प्रदेशात माझ्या गावी असणाऱ्या माझ्या कुटुंबाची मला खूप चिंता वाटते आहे.”

तेजपाल कश्यप – छायाचित्रकार

ओला- उबेर सारख्या प्रवासाच्या सुविधा देणाऱ्या चालकांनाही याचे परिणाम भोगावे लागत आहेत. दिल्लीतील विमान कंपनीच्या कामगारांना प्रवासाची सुविधा पुरविणारे चौधरी म्हणाले, “सरकारने माझ्यासारख्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. मला संचारबंदीचे महत्त्व कळते. कोरोना विषाणू धोकादायक आहे आणि आपण आपल्याला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. पण मी काहीच करू शकत नाही. विचार करा ही  संचारबंदी अशीच काही आठवडे सुरु राहिल्यास मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ कसा करू?” 

काही लोकांनी तर कोरोना विषाणूबद्दल ऐकलेलेही नाही. नाव उघड न करण्याच्या अटीवर एका चर्मकाराने माझ्याशी संवाद साधला. हे चर्मकार अलाहाबाद रेल्वेस्थानकावर वर्षानुवर्षे लोकांचे बूट पोलिश करण्याचे काम करीत आहेत ते म्हणाले, “आता कुणीच बूट पोलिश करायला येत नाही. लोकांनी का प्रवास बंद केला आहे, मला काहीच माहित नाही. नेमकं काय झालय हेसुद्धा मला माहीत नाही. आजकाल फारसे प्रवासी येत नाहीत. काहीतरी संचारबंदी लागू झालीय हे माहीत आहे, पण का ते मला माहीत नाही.”

चर्मकार बांधव

विनोद प्रजापती, जे याच परिसरात पाण्याच्या बाटल्या विकण्याचे काम करतात त्यांनी यांचे बोलणे थांबवले. 
ते म्हणाले, “मला कोरोना विषाणूबद्दल सगळी माहीती आहे. हा विषाणू खूप धोकादायक आहे आणि संपूर्ण जग या समस्येला सामोरे जात आहे. बरेच लोक ज्यांना घरी राहणे परवडणार आहे ते सुरक्षेसाठी घरी राहत आहेत. पण आमच्यासारख्या सुरक्षा आणि भूक असे दोन पर्याय असणाऱ्या लोकांनी कोणता पर्याय निवडावा??

अनुवाद करणाऱ्या जयश्री देसाई या मुक्त पत्रकार असून त्यांना प्रवास आणि वाचनाची विशेष आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 9146041816

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

मोठी बातमी! गोरगरीब जनता, कामगारांसाठी सरकारची १ लाख ७० हजार कोटींची घोषणा

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

#Coronavirus Impact | कोरोनाच्या अगोदर आम्हाला उपासमारीच मारेल! रोजंदारीवर कामाला जाणाऱ्यांची व्यथा

Leave a Comment