‘जवाद’ चक्रीवादळाने बदलली दिशा, मराठवाड्याचा धोका टळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील आठवड्यातील भारतीय उपखंडात सुरु असलेल्या हवामानातील बदलांनुसार येत्या 16,17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘जवाद’ चक्री वादळाचा तडाखा बसणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. मात्र मागील चार दिवसात चक्रीवादळाची दिशा बदलली असल्याने या तडाख्यातून महाराष्ट्राची सुटका झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही परतीच्या पावसाचा धिंगाणा सुरुच आहे.

हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पुढील पाच सहा दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता होती. याचा फटका 14 ऑक्टोबरदरम्यान आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगडला बसणार होता. तर महाराष्ट्रातील विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस 16 आणि 17 ऑक्टोबर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

दक्षिण चीन समुद्रातून ‘काम्पसु’ या उष्णकटिबंधीय वादळाची निर्मीती होताना दिसत आहे, दिनांक 11ऑक्टोबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे व पुढील 24 तासांमध्ये ही प्रणाली अधिक प्रभावी होईल. त्याचा मार्ग व्हिएतनाम, लाओस आणि थायलंड असा राहील असे दिसतो आहे. दिनांक 16 ऑक्टोबर पर्यंत याचा प्रभाव दिसतो आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेली बाष्प व कमी दाबाचे क्षेत्र आणखी पूर्व दिशेला खेचले जाईल. यावेळेस त्याची तीव्रता जास्त धोकादायक असेल आणि परावर्तित परिणाम म्हणून दिनांक 17 व 18 ऑक्टोबर दरम्यान पुर्वोत्तर, मध्य भारतातील अनेक राज्यांत पावसाचे आगमन होईल असे दिसते आहे, असे स्पष्टीकरण हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिले.

Leave a Comment