बायकोने ऑपरेशन केल्याच्या रागातून 2 चिमुकल्यांवर कोयत्याने वार : बापाला पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | पत्नीने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केल्याचा राग मनात धरून पतीने दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे येथे घडली आहे. यामध्ये श्लोक रामदास वायदंडे (वय- 5) व शिवम रामदास वायदंडे (वय- 6) अशी जखमी झालेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. तर रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) असे अटक केलेल्या बापाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दिलीप गुलाब तुपे (रा. मुंढे) यांनी कराड शहर पोलिसांत दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पत्नीने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन का केले? व तिला माहेरी का पाठवले? या कारणावरून रामदास वायदंडे हा रविवारी (दि. 18) सायंकाळी चार वाजल्यापासून घरांमध्ये भांडण करीत होता. तसेच स्वतःची मुले शिवम व श्लोक यांना हाताने मारहाण करीत होता. त्यामुळे इंदुबाई या शिवम व श्लोक यांना घेऊन घराबाहेर बसल्या होत्या. रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मुले खेळत- खेळत घरामध्ये गेली. त्यांच्या पाठीमागून इंदुबाई याही घरामध्ये गेल्या. तेव्हा रामदास याने घरामधील कोयता हातात घेऊन शिवीगाळ करत आता तुम्हाला ठार मारून टाकतो, असे म्हणून शिवम व श्लोक यांच्यावर कोयत्याने वार केले.

यामध्ये श्लोकच्या डोक्यावर मागील बाजूस कोयत्याचा वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच शिवम याच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार झाल्याने तोही जखमी झाला. यावेळी इंदुबाई वायदंडे यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी रामदास वायदंडे याच्या हातातील कोयता हिसकावून घेत जखमी श्लोक व शुभम या दोन चिमुकल्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. यापैकी 5 वर्षांच्या श्लोक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयित रामदास वायदंडे याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती सराटे करत आहेत.