औरंगाबाद : दोन दिवसापूर्वी कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून करून आरोपी पती ज्ञानेश्वर गाडेकर (५२) फरार झाला होता. पण शुक्रवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. तालुक्यातील गिरसावळी गावालगत डोंगराच्या परिसरात त्याने गळफास घेतला. पती-पत्नीतील वादाचा शेवट त्यांच्या मृत्यूने झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
गेल्या काही वर्षापासून पत्नी विमलाबाई गाडेकर हिच्यासोबत ज्ञानेश्वर गाडेकर याचा वाद सुरू होता. त्यामुळे ज्ञानेश्वर हा अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरात राहत असे. लॉकडाऊनमुळे तो गावाकडे आला असता पती-पत्नीत वाद सुरू झाला. म्हणून तो शेतात असलेल्या घरात एकटाच राहत होता. बुधवारी या वादाचा शेवट करण्याच्या इराद्याने तो शेतातून घरी आला णि पत्नी विमलाबाई वर कुर्हाडीचे घाव घालून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर घटनास्थळावरून तो फरार झाला.
मुलाच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात वडीलाविरुद्ध (ज्ञानेश्वर गाडेकर) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याच्या मागावर असताना शुक्रवारी ज्ञानेश्वर गाडेकर याने गिरसावळी गावालगत डोंगराच्या परिसरात गळफास घेतल्याचे समोर आले. याबाबत गावातील नागरिकांनी पोलीसांना माहिती दिली. फुलंब्री पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज फौजदार रघुवीर बोराडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.