Tuesday, June 6, 2023

धक्कादायक ! जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच क्षुल्लक कारणावरून संपवलं

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील वडगाव धायरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या नवविवाहित पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. या आरोपी तरुणाने एका क्षुल्लक कारणातून आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

निशा अजय निकाळजे असं हत्या झालेल्या 19 वर्षीय विवाहित तरुणीचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा विवाह विजय निकाळजे याच्याबरोबर झाला होता. या दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं प्रेमविवाह केला होता. दोघंही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी आहेत. लग्नानंतर कामाच्या शोधात विजय नवविवाहित पत्नी निशाला घेऊन पुण्यात आला होता. काही दिवस पुण्यातील जनता वसाहतीत राहिल्यानंतर ते वडगाव धायरी परिसरात राहण्यास गेला होता.

याठिकाणी त्यांचा संसार सुखानं सुरू होता. पण काही दिवसांतच विजय निशावर चारित्र्याचा संशय घेऊ लागला. ‘तू सातत्यानं मोबाइलवर कोणाशी बोलतेस’ असं विचारत त्यांच्यात सतत भांडण होत असे. याच कारणावरून शुक्रवारी दोघा पती-पत्नीत मोठा वाद झाला. हा वाद एवढा वाढला कि रागाच्या भरात विजयनं निशाचा गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर, फरार पती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.