Wednesday, October 5, 2022

Buy now

महिलादिनीच पतीने केली पत्नीची हत्या

औरंगाबाद – एकीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना एका निर्दयी पतीनेच पत्नीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पैठण शहरापासून जवळच असलेल्या औरंगाबाद रोडवरील संस्कृती हुरडा पार्टी येथे रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी आरोपीसह एकाला ताब्यात घेऊन पैठण ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक मोहनराव मुकुटमल (वय 35 रा.पैठण नवीन कावसन, पैठण शहर) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर अनिता मुकुटमल असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हा खुनाचा गुन्हा 12 तासाच्या उघडकीस आणला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अनिता अशोक मुकुटमल हिचे 20 वर्षापूर्वी लग्न झाले होते. यानंतर 10 वर्षापूर्वी आरोपीने दुसरे लग्न केले. पतीने दुसरे लग्न केल्यानंतरही अनिता ही पतीच्या घरी सासरी राहत होती. त्यामुळे या पती, पत्नीमध्ये वाद होत असे. तु सासरी राहू नको घर सोडून जा असे म्हणून तू गेली नाही तर तुझा एक दिवस काटा काढीन अशी धमकी दिली जात होती, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी आरोपीने पत्नीला चापटाने मारुन शिवीगाळही केली होती. यानंतर रविवारीच्या रात्री आरोपी पत्नीसह शहरालगतच्या पैठण- औरंगाबाद रोडवरील संस्कृती हुरडा पार्टी येथे आला. येथे त्याने पत्नीच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा खून केला. याबाबत माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

याबाबत मृत अनिताचा भाऊ नितीन देवराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सतीश भोसले, सुधाकर चव्हाण, रामकृष्ण सागडे, हेड कॉन्स्टेबल माळी, सुधीर ओहळ. राजेश आटोळे आदी पुढील तपास करीत आहेत.