कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा धारदार शस्त्राने खून

औरंगाबाद – उद्योग नगरी वाळूज महानगरात पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचा पतीने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना काल रात्री रांजणगाव परिसरातील दत्त नगरात घडली. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या शिवकन्या किरण खिल्लारे (23) हिचा पती किरण सोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादामुळे शिवकन्या काही दिवसांपासून आई जनाबाई कैलास सातवे हिच्यासोबत रांजणगाव येथे जनाबाई पवार यांच्या घरात किरायाने राहत होती. गुरुवारी किरण केशव खिल्लारे हा पत्नीला भेटण्यासाठी रांजणगाव येथे आला. रात्री आठ वाजेच्या सुमारास उजना बाईही घराबाहेर असल्याची संधी साधून किरणे शिवकन्या सोबत वाद घालून तिला मारहाण केली.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर किरणे सोबत आणलेल्या धारदार वस्तूने पत्नीच्या अंगावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला तडफडत असल्याचे पाहून तो पसार झाला. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त वनमाला वनकर, सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे पथकासह घटनास्थळी आले. गंभीर जखमी शिवकन्या ला शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी आरोपी किरणला रात्री उशिरा अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.