औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील एका खासगी सुरक्षा रक्षकाची पत्नी जुलैमध्ये बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांना अजूनही त्याचा शोध लागला नाही. या प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. न्यायालयाने पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी तपासाबाबत काय पावले उचलली आहेत. अशी विचारणा करत १३ डिसेंबरपर्यंत अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान उस्मानपुऱ्यातील रामराव घुले यांची पत्नी अश्विनी घुले ही जुलै महिन्यात आपल्या बाळाला घेऊन राहत्या घरून बेपत्ता झाली होती. या घटनेची तक्रार रामराव याने १७ जुलै २०१९ रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून अद्यापपर्यंत फिर्यादी पतीने संबंधित पोलिस ठाण्यात पत्नीच्या तपासासंदर्भात चौकशी केली. मात्र, पत्नीचा तपास न लागल्याने पती रामराव घुले याने ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यातर्फे औरंगाबाद खंडपीठात हेबियस कार्पस याचिका दाखल केली होती.
याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने औरंगाबाद पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक, महाराष्ट्र शासन यांना संबंधित सुरक्षारक्षक पतीने तक्रार दाखल झाल्यापासून बेपत्ता पत्नीचा शोध घेतला का? तपासाबाबत नेमकी कोणती पावले उचलली याविषयीचा अहवाल खंडपीठात १३ डिसेंबरपर्यंत सादर करावा असे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ डिसेंबर रोजी होणार आहे.