हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी मुंबई मागील ५ दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला अखेर आज यश आलं आहे. आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती, ती सरकारने मान्य करत सरकारने तातडीने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच याबाबतचा जीआर सुद्धा जारी करणार असल्याचं सांगितलं. सरकारच्या या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही समाधान व्यक्त केलं. परंतु हैदराबाद गॅझेट म्हणजे नेमकं काय आहे? हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे मराठा समाजाला कसा फायदा होईल हे तुम्हाला माहितेय का? चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो.
हैदराबाद गॅझेट म्हणजे 1918 साली तत्कालीन हैदराबाद निजामशाही सरकारने जारी केलेला आदेश/गॅझेट ,… त्याकाळी हैदराबाद संस्थानामध्ये मराठा समाज बहुसंख्य होता आणि त्यांची सत्ता व नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत असल्याची नोंद होती. त्यामुळेच निजामने आपल्या संस्थानात मराठा समाजाला “हिंदू मराठा” अशी नोंद करून शैक्षणिक व नोकरीत आरक्षण जाहीर केले. ज्याचा आदेशही काढला. तो हैदराबाद संस्थानाच्या अधिकृत गॅझेटद्वारे नोंदवण्यात आला म्हणून त्याला “हैदराबाद गॅझेट” म्हटलं जातं. या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाज आधीपासूनच मागास असल्याची नोंद शासकीय कागदपत्रांमध्ये आहे. यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून हैदराबाद गझेटियर लागू करावे अशी मागणी केली जात होती.
काय आहे हैदराबाद गॅझेटीयरमध्ये? Hyderabad Gazette
1) 1901 साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत 1901 साली प्रकाशित झाली.
2) या प्रती नुसार त्याकाळी मराठवाड्यात 36 टक्के मराठा कुणबी होते.
3) मराठा व कुणबी एकच असल्याचा दावा या हैद्राबाद गॅझेट मध्ये आढळतो.
4) मराठा समाज आधीपासूनच मागास म्हणून शासकीय कागदपत्रांमध्ये नोंद आहे
5) या प्रतीमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे.
दरम्यान, आज मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या महत्वाच्या मागण्या मान्य केल्या. त्यानुसार, सरकार हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करणार आहे. गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची हमी मराठा उपसमितीने दिली. तसेच राज्य सरकारने सातारा संस्थानचे गॅझेटही लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. सातारा गॅझेटिअरची जबाबदारी माझी अशी ग्वाही छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. तसेच मी खोटा शब्द देणार नाही असा विश्वासही त्यांनी मनोज जरांगे पाटील याना दिला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला आहे.
सरकारकडून कोणकोणत्या मागण्या मान्य – Hyderabad Gazette
१) हैद्राबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी तात्काळ करणार
२) सातारा गॅझेटिअरला एक महिना वेळ द्यावा… त्याची जबाबदारी शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली.
३) मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेणार, त्याबाबत लवकरच GR काढणार
४) मराठा आंदोलकांवरील दंड मागे घेणार
५) ‘मराठा आणि कुणबी एक आहे हे सिद्ध करणारी प्रक्रिया थोडी किचकट, त्यासाठी वेळ हवा




