हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्स वर रोमहर्षक विजय मिळवून रॉयल चॅलेंजर बंगळुरूने ट्रॉफी आपल्या नावावर केली… “इ साला कप नाम दे” हे ब्रीदवाक्य आरसीबीने यंदा खरं करून दाखवलं. तब्बल १८ वर्षांनी प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा आनंद आरसीबीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर जाणवला. यादरम्यान, विराट कोहलीला (Virat Kohli) अश्रू अनावर झाले… ज्या आयपीएल ट्रॉफीची इच्छा विराट मागच्या १८ वर्षांपासून ठेऊन होता ती ट्रॉफी त्याला मिळाली होती, त्याच स्वप्न पूर्ण झालं होते. मात्र ट्रॉफी जिंकताच कोहलीने असं विधान केलं आहे ज्याचं कनेक्शन हिटमॅन रोहित शर्माशी (Rohit Sharma) जोडलं जातंय. विराटचे स्टेटमेंट ऐकून रोहितच्या चाहत्यांना रागही येऊ शकतो.
नेमकं काय म्हणाला विराट?
सामना संपल्यानंतर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनशी बोलताना विराट कोहली म्हणाला, मी फक्त एक इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळू शकत नाही. मला संपूर्ण २० षटके क्षेत्ररक्षण करायचे आहे आणि मैदानावर माझ्या संघासाठी योगदान द्यायचे आहे. मी नेहमीच अशा प्रकारचा खेळाडू राहिलोय. देवाने मला त्या दृष्टिकोनाने, प्रतिभेने आशीर्वाद दिला. त्यामुळे माझ्या संघाला मी कसा फायदा करून देईन याचे मार्ग मी शोधत असतो असं विराट कोहली म्हणाला… विराटच्या इम्पॅक्ट प्लेयर वरील विधानानंतर त्याने रोहित शर्माला टोला तर मारला नाही ना? अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. त्यामागची करणेही तशीच आहे.
यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियसने रोहित शर्माचा वापर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून केला. रोहित फक्त बॅटिंग साठी मैदानात यायचा आणि फिल्डिंग वेळी तो डग आऊट मध्ये बसायचा. यंदा काही मोजक्याच सामन्यात रोहितने संपूर्ण २० ओव्हर क्षेत्ररक्षण केलं, बहुतांश वेळा तो डगआउटमध्येच दिसला. पंजाब विरुद्धच्या महत्वाच्या क्वालिफायर सामन्यातही रोहितला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरण्यात आलं होते. ज्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला ५ वेळा आयपीएल चॅम्पियन केलं त्या रोहितचा वापर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून होत असल्याचे पाहून त्याचे चाहते मुंबई इंडीयन्स वर नाराजही होते.. अखेर मुंबईला फटका बसलाच… आता विराट कोहलीने इम्पॅक्ट प्लेयर बद्दल विधान रोहित शर्माशी जोडलं जात आहे. खरं तर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही भारतीय क्रिकेटचा कणा आहे, एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे कोहलीने जाणून बुजून रोहितला टोला लगावला असेल असं वाटत नाही.