अयोध्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरेंना पवारांची NOC लागू नये हीचं अपेक्षा; प्रवीण दरेकरांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राम मंदिराबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवारांचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) लागणार नाही अशी अपेक्षा आहे,’ असा खोचक टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हाणला आहे.

‘पहले मंदिर फिर सरकार अशी शिवसेनेची लोकसभा निवडणुकीची आधी घोषणा होती. पण मंदिर होण्याआधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आता राम मंदिर होत आहे. मात्र, आता ते शरद पवारांसारखी भूमिका घेणार नाहीत. हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे कशाचाही पर्वा करणार नाहीत. शरद पवारांच्या एनओसीचीही गरज त्यांना लागणार नाही असं आम्हाला वाटतं,’ असा चिमटा दरेकर यांनी काढला.

भाजप नेत्यांच्या संतापाचं कारण तरी काय?
देशात कोरोना महामारीचे संकट असून येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आलं असून मोंदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. दरम्यान याबाबत शरद पवार यांना विचारलं असता,’कोरोनामुळं जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याचा विचार आम्ही करतोय. त्याला पहिलं प्राधान्य देतोय, पण काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल. त्यामुळं त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा,’ असं पवार म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्याने भाजप नेते संतापले असून महाराष्ट्र भाजप व मित्र पक्षांच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरलं आहे. ‘पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. त्याच्या वक्तव्यावर स्वत:ला हिंदू म्हणवणारे उद्धव ठाकरे गप्प का आहेत, असा प्रश्न ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. तर, प्रवीण दरेकर यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment