मोदी पंतप्रधान झाल्यास मी मुंडन करेन; बड्या नेत्याची भीष्मप्रतिज्ञा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून ४ जूनला निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी काल अनेक वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल जाहीर करत देशात कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं एकूण चित्र दिसत आहे. मात्र तत्पूर्वी आप नेते सोमनाथ भारती (Somnath Bharti) यांनी एक मोठं विधान केलं आहे. जर मोदी पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन असं त्यांनी म्हंटल आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

काय आहे सोमनाथ भारती यांचे ट्विट??

माझे शब्द लिहून ठेवा, जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करीन. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. दिल्लीत सातही जागा INDIA आघाडीकडे जाणार आहेत. मोदींच्या भीतीमुळे एक्झिट पोल त्यांना सैल दाखवू देत नाहीत. म्हणून आपण सर्वांनी 4 जून रोजी होणाऱ्या निकालांची प्रतीक्षा करावी लागेल. लोकांनी प्रचंड विरोधात मतदान केले आहे असं ट्विट सोमनाथ भारती यांनी केलं.

दरम्यान, सोमनाथ भारती नवी दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांच्याविरोधात त्यांचा सामना आहे. यंदा आम आदमी पार्टीने दिल्लीतील चार जागांवर निवडणूक लढवली होती, तर काँग्रेसने तीन जागांवर उमेदवार उभे केले होते. पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली या जागांवर ‘आप’ने निवडणूक लढवली. तर काँग्रेस चांदणी चौक, उत्तर पश्चिम दिल्ली आणि ईशान्य दिल्लीत निवडणूक लढवत आहे.