ICC ने भारताकडे दिली 3 मोठ्या स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी, पाकिस्तानमध्ये होणार चॅम्पियन्स ट्रॉफी

दुबई । ICC ने 2024 ते 2031 दरम्यान होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांच्या यजमानांची घोषणा केली आहे. भारताकडे 3 मोठ्या स्पर्धांची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतात 2026 टी-20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. 2023 चा एकदिवसीय विश्वचषकही भारतात होणार असल्याची माहिती आहे. दीर्घ काळानंतर पाकिस्तानला ICC स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तिथे 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.

ICC ने मंगळवारी स्पर्धेची ठिकाण जाहीर केले. 2024 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला ही जबाबदारी देण्यात आली आहे. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होऊ शकतो. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे तर 2026 मध्ये T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये होणार आहे.

नामिबियात एकदिवसीय विश्वचषक
ICC ने 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची जबाबदारी झिम्बाब्वे, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेकडे दिली आहे. 2028 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. नुकतेच UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषकाचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकावले होते. 2029 मध्ये ICC स्पर्धा पुन्हा एकदा भारतात परतणार आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार आहे.

दर 2 वर्षांनी T20 विश्वचषक
ICC दर 2 वर्षांनी T20 विश्वचषक आयोजित करेल. 2030 मध्ये होणारा T20 विश्वचषक इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये खेळवला जाईल. त्याच वेळी, 2031 मध्ये, एकदिवसीय विश्वचषक फक्त भारतातच आयोजित केला जाईल. एकूण 12 देशांमध्ये 8 स्पर्धा होणार आहेत.

You might also like