मुंबई । आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती उद्योजक दीपक कोचर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी नाकारली आहे. या याचिकेत, कोचर यांनी कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सुरू केलेली कारवाई रद्द करण्याचे आवाहन केले आहे.
दीपक कोचरला ED ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक केली होती. आपल्या याचिकेत त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे, असे सांगून की 1 ऑक्टोबर रोजी कथित मनी लाँडरिंग प्रकरणात ट्रायल कोर्ट त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करू शकते.
न्यायमूर्ती एस के शिंदे म्हणाले की,”ते या याचिकेवर लगेच सुनावणी घेणार नाहीत.” ते पुढे म्हणाले कि, “या प्रकरणात घाई कशाची आहे. मी या प्रकरणाला प्राधान्य का द्यावे? मी या प्रकरणाची सुनावणी फक्त यामुळे करू कारण कि ट्रायल कोर्ट कारवाई करत आहे. मी तसे करण्यास बांधील नाही. ” न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 22 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे.
काय प्रकरण आहे ?
2009 मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ असताना त्यांच्या कार्यकाळात चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजला 300 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. कर्ज मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजने दीपक कोचर यांच्या फर्म NuPower Renewable Private Limited (NRPL) ला 64 कोटी रुपये ट्रान्सफर केले.