दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस
माण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी बिले गेली दोन वर्षापासून अडकलेली आहेत. तेव्हा प्रशासनाने आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करावीत. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शहराध्यक्ष जोतिराम जाधव, शेतकरी संघटना अध्यक्ष शंकरराव जाधव यांनी पंचायत समिती माण या ठिकाणी विस्तार अधिकारी व सभापती यांना निवेदन दिले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांची रोजगार हमी योजनेतील गाय गोठा, शेळीपालन गोठा व कुक्कुटपालन शेड यांची अडकलेली बिले एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावी, ही बिले आठ दिवसाच्या आत न जमा केल्यास शेतकरी संघटना पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र बोंबाबोंब आंदोलन करेल यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला प्रशासन जबाबदार असेल. शेतकरी संघटनेचे सोशल मिडिया सेल केशव जाधव यांनी माण खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
निवेदनावरती शंकर जाधव, जोतीराम जाधव, बाळासाहेब भोसले, अोमकार जाधव, स्वप्नाली जाधव, अजित जाधव, शालन भोसले यांच्या सह्या आहेत.