कोरोना रुग्ण वाढल्यास पुन्हा रुग्णसेवा करु पण आता तरी आम्हाला शस्त्रक्रिया शिकू द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीच्या काळात कोरोना रुग्णांना सेवा देत आहोत, आता रुग्ण संख्या कमी होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढतील तेव्हा परत सेवा देऊ परंतु आता तरी आम्हाला शस्त्रक्रिया शिकू द्या अशी मागणी घाटीतील सर्जिकल शाखा मानल्या जाणाऱ्या शल्यचिकित्सा, कान, नाक, घसा, नेत्ररोग, अस्थिव्यंगोपचार विभागाच्या घाटीतील निवासी डाॅक्टरांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विभागीय टर्शरी केअर सेंटर आहे. गेल्या दीड वर्षात 10 हजार 424 गंभीर कोरोना बाधितांवर घाटीत उपचार केले गेले. आठशेहून अधिक खाटांवर कोरोना रुग्णांना रुग्णसेवा दिल्या जात असल्याने औषधवैद्यकशास्त्र, वार्धक्यशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागासोबत इतर सर्जरी ब्रँचेस समजल्या जाणाऱ्या शल्यचिकित्सा, कान, नाक, घसा, नेत्ररोग, अस्थिव्यंगोपचार विभागाचेही निवासी डाॅक्टर कोरोना रुग्णसेवेत गुंतले आहे.

यामध्ये एमडी, एमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशित डाॅक्टरांचे शैक्षणिक नुकसान झाले. कोरोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र हाऊस ऑफिसर भरल्यास रुग्णसेवेचा ताण विद्यार्थी डाॅक्टरांवर येणार नाही; मात्र त्यांना वेळेवर पगार न दिल्याने ते डाॅक्टर सेवा सोडून जातात. त्यामुळे निवासी डाॅक्टरांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मत घाटीतील निवासी डाॅक्टरांनी व्यक्त केले.

सर्जिकल ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांची धडपड
गेल्या दीड वर्षात मूळ अभ्यासक्रमाऐवजी कनिष्ठ निवासी 1 (जेआर 1), कनिष्ठ निवासी 2 (जेआर 2), कनिष्ठ निवासी 3 (जेआर3) डाॅक्टरांनी कोरोनात सेवा दिली. आता (जेआर 3) झालेल्या डाॅक्टरांना शेवटच्या वर्षात तरी सर्जरी शिकायला मिळावी यासाठी सर्जिकल ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांची धडपड सुरु आहे.
– डाॅ. आबासाहेब तिडके, एमएस सर्जरी विभागाचे विद्यार्थी

विद्यार्थ्यांना परत पाठवण्याचे नियोजन
रुग्ण कमी झाल्याने केवळ 47 बाधित रुग्ण भरती आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी एकच वॉर्ड सुरु आहे. त्यामुळे सर्जिकलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गृह विभागात काम करण्यासाठी, शिक्षणासाठी परत पाठवण्याचे नियोजन केले आहे. आता ते विद्यार्थी मूळ अभ्यासक्रम शिकू शकतील.
– डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), औरंगाबाद

Leave a Comment