हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1990 च्या दशकाच्या सुरूवातीला भारताला एका गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तयावेळी परदेशी गुंतवणूक कमी झाली होती, इन्स्पेक्टर राज मुळे उद्योगधंदे सुरू करणे कठीण होऊन बसले होते, आणि देशाची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. अशा स्थितीत भारताच्या आर्थिक धोरणांना एक मोठी परीक्षा द्यावी लागत होती . पण मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांनी हे सिद्ध केलं की योग्य दिशा आणि नेतृत्वासोबत कोणत्याही संकटाचा सामना केला जाऊ शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी मनमोहन सिंग यांचा सिहाचा वाटा आहे.
मनमोहन सिंग यांना वित्तमंत्रीपदाची जबाबदारी –
1991 मध्ये नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांना वित्तमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. सिंग यांचा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील साखेचा उपयोग देशाला बाहेर काढण्यासाठी करण्यात आला. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर राहिले होते, तसेच त्यांनी आर्थिक धोरणांवर आधीच मोठे काम केले होते. त्याचसोबत त्यांनी 24 जुलै 1991 रोजी सादर केलेल्या त्यांच्या बजेटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे परिवर्तन घडून आले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठ्याप्रमाणात चालना मिळाली . म्हणून मनमोहन सिंग याना अर्थव्यस्थेला बळकटी आणणारा सिंह असल्याचे म्हंटले जाते.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण बदल –
1991 च्या बजेटमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण बदल केले गेले. त्यात लायसन्स-परमिट राजाचा शेवट करण्यात आला, ज्यामुळे उद्योग-व्यवसायांवरील अनेक निर्बंध काढले गेले. यामुळे व्यावसायिक गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आयात-निर्यात धोरणांमध्ये बदल करण्यात आले, ज्यामुळे परकीय व्यापारात सुधारणा झाली. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने परकीय कंपन्यांना आकर्षित करण्याचे पाऊल उचलले, ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळाली. याशिवाय, सॉफ्टवेअर उद्योगाला विशेष सवलती देण्यात आल्या, ज्यामुळे भारत सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये एक महत्त्वपूर्ण केंद्र बनला. या सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अधिक खुले आणि प्रतिस्पर्धी बनली. याचा मोठा फायदा भारताला झाला .
नव्या युगाचा प्रारंभ –
या सुधारणा केवळ देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरल्या नाहीत, तर त्यांनी भारताला तीन दशकांत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून दिले. या सुधारणांमुळे लाखो रोजगार निर्माण झाले, आणि कोट्यवधी लोक गरिबीच्या रेषेवरून वर आले. 1991 च्या या बदलांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या नव्या युगाचा प्रारंभ केला.