बुलढाणा प्रतिनिधी । ‘सत्तेत आल्यानंतर राफेलची सखोल चौकशी करून त्यामागील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे देशात संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देणार म्हणजे देणार’ असे आश्वासन राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये दिले.
प्रचार सभेला संबोधित करतांना त्यांनी बीजेपी सरकारवर जोरदार टिका केली. लोकशाहीची चौकट मोडू पाहणाऱ्या पंतप्रधान मोदी व बीजेपीला हटवून परिवर्तन करण्यासाठी आणि मोदी सरकार घालवण्यासाठी सज्ज व्हा. आम्ही नुसत्या घोषणा करत नाही, तर यापूर्वीही कर्जमाफी करुन दाखवली आहे. महाआघाडीचे सरकार आले तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेलच. पण शेतकऱ्यांनी त्यावर शांत बसायचं नाही. सरसकट कर्जमाफी झाली की, नवीन कर्ज मिळेल, त्या नव्या कर्जाच्या आधारावर शेतकऱ्यांनी चांगले बी-बियाणे घ्यावे आणि जोमाने शेती करावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही म्हणजे नाहीच,अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.