कराड | शंभूराज देसाई साहेब आपलं कर्तव्य करत आहेत. स्व. काकांनी आपलं काम केले. आता पुढील वाटचालीसाठी गावची एकजूट ठेवणे गरजेचे आहे. निवडणूका प्रबोधन करण्याचे काम करतात. परंतु अमिषाला बळी पडलात तर गुलामगिरी पत्करावी लागते. लोकनेते बाळासाहेब देसाई, विलासराव पाटील काका यांनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही, म्हणून आजही लोक त्यांची नावं काढतात. राष्ट्रीय विचारधारा जपणे काळाची गरज आहे., असे आवाहन अँड. उदयसिंह पाटील यांनी केले.
पाठरवाडी- गमेवाडी (ता.कराड) येथे सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग सातारा यांच्या रस्ता कामाच्या भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोरोना योध्द्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, विजय पवार, बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक हणमंतराव चव्हाण, कोयना दूध संघाचे संचालक लक्ष्मण देसाई, अविनाश पाटील, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य सविताताई संकपाळ, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील, जिल्हा परिषदेचे उपअभियंता आर. जे. पाटील, संतोष जाधव यांच्यासह गमेवाडी गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील म्हणाले, कै. विलासराव पाटील काका यांनी या भागात विकासकामांची मुर्हुतमेढ रोवली. त्यांच्या पाठीमागे जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील आणि विद्यमान आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या भागात विकासकामांची गंगा वाहत ठेवली आहे. काकांच्या विचारांचा सुपने- तांबवे भाग नेहमीच अँड. उदयसिंह पाटील यांच्या पाठिशी ठामपणे राहील. सूत्रसंचालन सतिश यादव यांनी केले. आभार संतोष जाधव यांनी मानले.