हवं तर काँग्रेसनं पाठवलेल्या बसेसला भाजपचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी ‘त्या’ बस सोडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी काँग्रेसकडून सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी आदित्यनाथ सरकारमध्ये खडाजंगी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी बुधवारी पत्रकारपरिषद घेऊन योगी सरकारवर हल्ला चढवला. ”ही वेळ राजकारणाची नसून आपण स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशातील मजूर आपापल्या मूळगावी परतत आहेत. हे लोक फक्त भारतीयच नाहीत तर ते देशाचा कणा आहेत. ते आपलं रक्त आणि घाम गाळतात म्हणून देश चालतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.” असं प्रियांका गांधींनी पत्रकारपरिषदेत म्हटलं.

तसेच ”आम्ही २४ तासांपूर्वीच या मजुरांसाठी बसेसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारला या बसेस मजुरांना परत आणण्यासाठी वापराव्यात. पण या बसेसना उत्तर प्रदेशच्या हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. हवं तर तुम्ही या सर्व बसगाड्यांवर भाजपचे झेंडे आणि स्टीकर लावा. या बसगाड्यांची व्यवस्था भाजपने केली असेही सांगा. परंतु, कृपा करुन या बस चालवण्यात याव्यात,” अशी विनंती प्रियंका गांधी यांनी योगी सरकारला केली आहे.

नेमकं काय आहे वादाचं कारण?
काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशकडे परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी १ हजार बसेसची व्यवस्था केली आहे. सुरुवातीला या बसेस चालवण्यासाठी योगी सरकारने परवानगी दिली नव्हती. बऱ्याच गदारोळानंतर योगी सरकार त्यासाठी राजी झाले. मात्र, योगी सरकारने आधी काँग्रेसकडून या १ हजार बसेसचा तपशील मागवला. त्यानंतर योगी सरकारच्या पुढच्या मागणीनुसार काँग्रेसकडून १ हजार बसगाड्यांचा वाहन क्रमांक, त्यांचे चालक असा सगळा तपशीलही पुरवण्यात आला. मात्र, यानंतरही योगी सरकारने काँग्रेसने १ हजार बसेसची व्यवस्था केल्याचा दावा फेटाळून लावला. वाहनांचे क्रमांक तपासले असता यापैकी अनेक गाड्या बस नसून बाईक, कार आणि रिक्षा असल्याचे निदर्शनास आल्याचे योगी सरकारचे म्हणणे आहे. मात्र, काँग्रेसनं हा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या बस अजूनही मजुरांना गावी पोहचवण्याच्या प्रतीक्षेत असून हवं तर काँग्रेसनं पाठवलेल्या बसेसला भाजपचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी ‘त्या’ बस सोडा अशी विनंती प्रियांका गांधींनी केली योगी सरकारला आता केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment