हातगेघर मुऱ्हा इकोसेन्सटीव्ह झोनमध्ये धनदांडग्यांकडून बेकायदेशीरपणे बांधकाम सुरुच; महसूल विभाग मॅनेज असल्याची चर्चा

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या इकोसेन्सटीव्ह झोनमध्ये समाविष्ट असलेल्या हातगेघर मुऱ्हा या निसर्गरम्य अतिउंच डोंगर कड्यावर नियम वेशीला टांगून मुंबईच्या बिर्ला ग्रुप कंपनीकडून राजरोसपणे २० ते २२ समुह बंगल्याची बेकायदेशीर बांधकामे सुरु आहेत. या समुह बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामामध्ये जावली महसुल विभागाने नोटीस काढुन फक्त जुजबी कारवाई केली असल्याची माहीती समोर आली आहे. जावली तालुक्यातील निसर्गरम्य प्रदेश तसेच पाचगणी व भिलार यापासून जवळच हातगेघर मुऱ्हा हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील प्रदेश आहे.

हातगेघर मुऱ्हा हे गाव महाबळेश्वर पाचगणीच्या कोअर बफर झोन व सातारा जिल्ह्यांच्या इकोसेन्सटीव्ह झोनमध्ये समाविष्ठ असल्याची माहीती समोर आली आहे. बफर कोअर झोन व इकोसेन्सटीव्ह झोनमध्ये पर्यावरणाचा बचाव करण्याकरता तसेच बांधकाम करण्याकरता फार कमी चटई क्षेत्राची तरतुद आहे. असं असताना मुंबईच्या धनिकाने हातगेघर मुऱ्हा येथील १०९२ व १०९३ या गटामध्ये राजेरोसपणे समुह बंगल्याची रचना करत नियम वेशीला टांगून इमल्यावर इमले उभे केले आहेत. कड्याच्या टोकावर नियमबाह्य व बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याचंही समोर आलं आहे.

संबंधित सर्व बांधकामाच्या बेकायदेशीर उत्खननाचा दंडदेखील तत्कालीन तहसिलदार रणजीत देसाई यांनी केला होता. समुह बंगल्याच्या बांधकामाचा भूखंड सरकार जमा देखील करण्यात आला होता. मात्र मुंबईच्या धनिकाचे महसुलमधील उच्चपदस्थ अधिकारी ते स्थानिक तलाठी यांच्याशी असलेल्या हितसंबधामुळे समुह बंगल्याच्या जोत्याच्या बांधकामावेळी दंड ठोठावला असतानाही हातगेगघर मुऱ्हाच्या समुह बंगल्याच्या बांधकामात छत टाकुन काम पुर्ण करण्यात आलं आहे. जावली तालुक्याच्या महसुल विभागाकडुन हातगेघर मुर्ह्याच्या समुह बंगल्याच्या बेकायदेशी बांधकामावर हातोडा कधी पडणार हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. जावलीच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावामधेच मुंबईचे धनदांडगे गिधाडाप्रमाणे घिरट्या मारत आहेत. महसुल प्रशासनाने कायदा फक्त कागदावरच एवढीच बिरुदावली गिरवली अाहे. मुंबईच्या धनदांडग्यांच्या हातगेघर मुऱ्हा येथील बेकायदेशीर बांधकामाला महसुल विभाग बुलडोझर लावणार का ? असा सवाल सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like