सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
संपूर्ण राज्यात बेकायदा वाळू उपशाविरोधात सरकारी अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई केली जाते. बऱ्याच ठिकाणी या कारवाईमध्ये ठेकेदारांचे वाहने देखील जप्त केले जातात. मात्र आणखी छुप्या मार्गाने त्यांच्याकडून वाळू उपसा केला जातोच. सध्या असाच एक प्रकार कराडमध्ये सुरु आहे. जिल्ह्यातील महत्वाचे प्रेरणास्थान असलेल्या कराड येथील प्रीतिसंगमाजवळील कृष्णा नदी पात्रातच बेकायदा वाळू उपसा केला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
कराड शहरात कृष्णा कोयनेच्या संगमावर वसलेल्या प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे. या प्रेरणास्थळाचे दर्शन घेण्यासाठी असंख्य लोक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे याठिकाणचे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विशेष महत्व आहे. मात्र या ठिकाणाच्या शेजारीच बेकायदा वाळू उपसा केले जात असल्याचे सध्या दिसत आहे.
प्रीती संगमावरील कृष्णा नदीतील यशवंतराव चव्हाण समाधी शेजारील वाळूची बेकायदा रोज रात्री चोरी होत आहे. रोज वाळू चोरी होत असल्याचे माहिती असुनही महसुल प्रशासनाकडुन कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ कराडकर नागरिकांमधुन प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान वाळू माफिया आणि महसुल प्रशासन यांचे एकमेकांसोबत साटेलोटे सुरु आहे असा आरोप देखील येथील नागरिकांकडुन होत आहे.