लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापणे भोवले; पतीराजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

 

औरंगाबाद: लग्नाच्या वाढदिवशी पत्नी समोर फुशारकी दाखवित तलवारीने केक कापणाऱ्या पतीला चांगलेच भोवले. व्हिडिओ व्हायरल होताच काही तासातच पोलिसांनी पतीला अटक केली.ही घटना 1 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विश्रांतीनगर घडली.
दीपक जनार्धन सरकटे वय-23 (रा. विश्रांतीनगर,गारखेडा परिसर, औरंगाबाद) असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 1 मे रोजी लग्नाचे वाढदिवस असल्याने दीपक केक आणला होता, यावेळी पत्नी समोर फुशारकी मारण्यासाठी त्याने घरातील तलवार आणली व त्या तलवारीने केक कापला शिवाय या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकला.हा व्हायरल व्हिडिओ पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांना मिळताच त्यांनी तातडीने या विडिओ बाबत माहिती घेण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी माहिती घेतली असता तो व्हिडिओ पुंडलीकनगर परिसरातील विश्रांतीनगर येथिल फायनान्स कंपनी मध्ये वसुलीचे काम करणाऱ्या दीपक सरकटे यांचा असल्याचे समोर आले.पोलिसांनी तातडीने दीपकचे घर गाठत त्याला ताब्यात घेतले.व पलंगाखाली लपवुन ठेवलेली धारदार तलवार जप्त केली. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे करीत आहेत.

You might also like