औरंगाबाद – शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विश्वास नगर- लेबर कॉलनीतील घरे पाडण्यावर प्रशासन ठाम असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे 17 पथकांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. रविवारी 17 पथकांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यात प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या. सोमवारी किंवा मंगळवारी ही कारवाई होणार होती, मात्र त्रिपुरातील कथित हिंसाचार प्रकरणानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील वातावरण बिघडू नये, यासाठी ही कारवाई सध्या थांबवण्यात आली आहे.
रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात लेबर कॉलनीतील पाडापाडी संदर्भात बैठक झाली. यात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजुल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मंदार वैद्य, पोलीस उप अधीक्षक उज्वला बनकर तसेच मनपा, बांधकाम, तहसील कार्यालय, घाटी, खनिकर्म, महावितरण, बीएसएनएल आदी विभागांतील अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी कॉलनीवर हतोडा पडण्यापासून तुमचा बचाव करू असे आश्वासन दिले असले तरीही कॉलनीत राहणाऱ्या ज्या कर्मचाऱ्याचे निधन झाले आहे, त्याच्या निराधार कुटुंबानाच घर मिळवून दिले जातील, अशी स्थिती आहे.
तसेच त्रिपुरा तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी लेबर कॉलनीतील पाडापाडीची कारवाई तूर्तास रोखण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली.