विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुखास तात्काळ सेवामूक्त करा

bAMU
bAMU
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुखाला तात्काळ सेवामुक्त करून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी डावात मचाळा पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे एक निवेदन पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष नवनीत तापडिया यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना आज दिले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, विद्यापीठातील एका विद्यार्थीनीला जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी आक्षेपार्ह मेसेज केले होते. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनीने विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुखांकडे याची केली. परंतु त्यांनी या तक्रारीची दखल न घेता उलट त्या विद्यार्थीनीला दामिनी सिनेमाची स्टोरी सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचाराविरोधात तक्रार करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु याठिकाणी या समितीने त्या विद्यार्थीनीच्या तक्रारीवर समर्पक कारवाई केली नाही. परिणामी विद्यार्थीनीने थेट पोलिस ठाण्यात जनसंपर्क अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. यामुळे विद्यापीठाची राज्यभर नाहक बदनामी झाली. जर या अंतर्गत तक्रार निवारण समितीने वेळीच तक्रारीवर कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती आणि परिणामी विद्यापीठाची बदनामी झाली नसती. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच यासर्व बाबींमुळे विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुखास तात्काळ सेवामूक्त करुन त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समिती नव्याने पुनर्गठन करण्यात यावी. अशीही मागणी पार्टीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तसेच मागण्या येत्या 8 दिवसांत पुर्ण न झाल्यास पार्टीच्या वतीने विद्यापीठात आगळेवेगळे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

“विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या या हलगर्जीपणामुळे विद्यापीठाशी राज्यभर नाहक बदनामी झाली आहे. जर या समितीने वेळीच दाखल घेतली असती तर विद्यापीठाची बदनामी मुळीच झाली नसती. त्यामुळे या समितीच्या प्रमुखास तात्काळ सेवामुक्त करावे तसेच आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या समितीच्या प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचप्रमाणे विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करून नव्याने समिती स्थापन करण्यात यावी.” – नवनीत तापडिया, युवा जिल्हाध्यक्ष, डावात मचाळा पार्टी