औरंगाबाद | सध्या जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता संचारबंदी आहे. याचा फटका मजूरांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या मजूरांना दोन वेळच्या जेवणाची सोय होणे देखील कठीण झाले आहे. या मजूरांना राज्य सरकार व केंद्र सरकारतर्फे मोफत धान्य दिल्या जात आहे. मात्र त्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. परंतु, सध्याचा संकटाचा काळ लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य कामगारांना रेशनकार्ड नसल्यास आधार कार्डवर मोफत धान्य द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाद्वारे औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या कठीण परिस्थतीत केवळ रेशनकार्ड असणाऱ्यांनाच धान्य वाटप करणे उचित ठरणार नाही. कारण अनेक कुटुंबाकडे रेशन कार्ड नाहीत तसेच रेशनकार्ड असूनही त्यांना धान्य मिळत नाही. कामगारांची हि अडचण लक्षात घेता कोणताही कामगार धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी रेशनकार्ड नसल्यास आधार कार्ड वर मोफत धान्य देण्यात यावे अशी मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे
तसेच लसीकरण संदर्भात अद्यापही गोंधळलेली परिस्थिती आहे. ऑनलाईन नोंदी होत नसून लसीकरण नेमके कुठे होते याचीही माहिती मिळत नसल्याने याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. परिणामी नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि लसीकरण केंद्रावर गर्दीही होणार नाही. सद्यपरिस्थितीत अनेक खाजगी रुग्णालयात रुग्णांची लुट होत असून अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येत आहेत. प्रशासनाने नोटीस बजावली तरीही या रुग्णालयांचा मनमानी कारभार अजूनही सुरूच असून संबंधित रुग्णालयावर कायदेशीर कारवाई व्हावी व यामध्ये पारदर्शकता असावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.